6 महिन्यात एकही सुट्टी न घेता कोरोनाग्रस्तांची सेवा, निकीता शिर्के यांची कौतुकास्पद कामगिरी

चिपळूण-गुहागर मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला असलेल्या डॉ.निकीता शिर्के यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 6 महिने एकही सुट्टी न घेता त्यांनी उपचारासाठी येणाऱ्या कोरोनाग्रस्तांना ठणठणीत बरे करून घरी पाठवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. या आरोग्य केंद्रात त्या 4 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. रामपूर आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण 26 गावांचा समावेश होतो. सुरुवातीच्या काळात एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने सर्व कामाचा भार शिर्के यांच्यावर पडत होता. जबाबदारीची जाणीव असल्याने आपल्याला हा भार वाटला नाही असे डॉ.निकीता शिर्के यांनी सांगितले आहे.

रामपूर आरोग्य केंद्रातंर्गत एकूण 6 उपकेंद्र आहेत. त्यातील काही उपकेंद्रातील पदे रिक्त असल्याने तिथला भारही प्राथमिक आरोग्य केंद्रावरच येत होता. निकीता शिर्के यांचे वडील हे शिक्षक आहेत. त्यांनी निकीता यांना कोणतेही काम हे पध्दतशीरपणे आणि विनातक्रार करायचे हे संस्कार दिले होते. त्या संस्कारांमुळे डॉ.निकीता यांनी विनातक्रार आजपर्यंत त्यांचे काम चोखपणे बजावले. कोरोनाचा पहिला रुग्ण रामपूर भागातील वाघीवरे मोहल्ला येथे 24 मे 2020 रोजी सापडला होता. तेव्हापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रातून डॉनिकीता आणि सहकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यास सुरूवात केली होती. नुसते उपचार इतक्यापुरत्या मर्यादीत न राहाता त्यांनी सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील यांच्यासोबत बैठका घेऊन कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम केले. आशा स्वयंसेविकांच्या मदतीनेना गृहभेटी करण्याचे नियोजनही त्यांनी आखून दिले. जुलै महिन्याच्या अखेरीस घोणसरे येथे रुग्ण मिळाल्यानंतर लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. प्राथमिक केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या वृध्द, ज्येष्ठ नागरिक यांना कोरोना आपत्तीत आरोग्याची काळजी कशी घ्यायची, नियम कसे पाळायचे हे सांगण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या मनातील चिंता दूर होऊ शकली असे डॉ.शिर्के यांनी सांगितले. डॉ.शिर्के यांनी कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासोबतच कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनाही रुग्णांना पटवून दिल्या. शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही नवी मोहीमही त्यांनी प्रभावीपणे राबवण्यास सुरूवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या