बापरे! 15 वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून काढली फुटबॉल एवढी गाठ

भायखळामध्ये राहणाऱ्या प्रतीक बरकडे (वय 15) या मुलाला डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. त्याच्या उजव्या छातीच्या पोकळीत 16 सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची गाठ होती. ही गाठ एखाद्या फुटबॉलएवढी होती आणि तिचं वजन सुमारे दीड किलो होते. वॉक्हार्ट रुग्णालयाचे शल्यचिकीत्सक डॉ. उपेंद्र भालेराव यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने ही गाठ शस्त्रक्रिया करून काढली आहे. ज्यामुळे प्रतीकला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेणं शक्य झालं आहे.

प्रतीकला छातीत दुखणं, दम लागणं, खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला होता. ही कोरोनाच्या रुग्णात दिसणारी लक्षणे असल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने वोक्हार्ट रूग्णालयात तपासणीसाठी आणले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या छातीचा सीटीस्कॅन केला होता. अहवालात त्याच्या फुफ्फुसांत गाठ असल्याचे दिसून आलं होतं. ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिस सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव यांनी या मुलावर शस्त्रक्रिया करायचे ठरवले होते. ते म्हणाले की वेळेवर उपचार न केल्याने प्रतीकच्या वाढत्या वयाबरोबर ट्यूमर वाढला होता. हा ट्यूमर फुटबॉलच्या आकाराचा झाल्याने फुफ्फुसे, श्वसननलिका व हदय यावर विपरित परिणाम होऊ लागला होता.

फुफ्फुसात आढळून येणारे ट्यूमर अतिशय दुर्मिळ असते. धुरामुळे होणाऱ्या संसर्गामुळे हा त्रास उद्भवू शकतो. यावर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय आहे, असे डॉ.उपेंद्र भालेराव यांनी सांगितले आहे. प्रतीकच्या आईवडिलांना त्याच्या फुफ्फुसामध्ये गाठ आहे हे कळालं तेव्हा ते हादरले होते. वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच निदान व शस्त्रक्रिया केल्याने माझ्या मुलाचे प्राण वाचल्याची भावना प्रतीकचे वडील मयूर यांनी व्यक्त केली. प्रतिकच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून तो पूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगू लागला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या