पश्चिम बंगालमधील डॉक्टर हल्ल्याचे पडसाद रायगडात, डॉक्टरांच्या संपामुळे वैद्यकीय सेवा कोलमडली

सामना प्रतिनिधी । अलिबाग

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएने पुकारलेल्या बंदला रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील 2 हजार डॉक्टर्स आणि 500 खासगी रुग्णालयांनी आंदोलनात सहभाग घेतला. तर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फीती लाऊन काम केले. डॉक्टरांच्या संपामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर मोठा परीणाम झाला.

पश्चिम बंगालमधील डॉक्टर हल्ल्याच्या निषेधार्थ  वैद्यकीय संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन हल्ल्याचा निषेध केला. यावेळी त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर राज्य सरकारने केलेल्या डॉक्टरांवरील हल्ला विरोधी कायद्याची कठोर अमंलबजावणी करण्याची मागणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले हा अजामिनपात्र गुन्हा कराव तसेच याबाबचे खटले जलदगती न्यायालयात चालवले जावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी आयएमए अलिबागचे डॉ. राजेंद्र चांदोरकर, आरएमए रायगडचे डॉ. देवेंद्र जाधव, बालरोग तज्ञ संघटनेचे डॉ. विनायक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते.