डॉक्टर बनले देवदूत….यशस्वी शस्त्रक्रिया करत काढली मेंदूतून गोळी

21
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, पुणे

डोक्यात गोळी लागल्यानंतर प्राण वाचणे निव्वळ अशक्यच. अशा घटनेत प्राण वाचण्याचे प्रमाण दुर्मिळ असते. मात्र, एका २४ वर्षीय रूग्णाच्या डोक्यात गोळी लागून सुध्दा तो जिवंत आहे. त्याला त्वरीत मिळालेले उपचार आणि न्यूरोसर्जन डॉ. सचिन गांधी यांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे प्राण वाचले आहेत.

रूबी हॉल वानवडी येथे या रूग्णाला तातडीने हलविल्यानंतर त्याला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. चाचण्या व स्कॅन्सद्वारे रूबी हॉलचे नामवंत न्यूरोसर्जन डॉ.सचिन गांधी यांना हे लक्षात आले की,मेंदूमध्ये या गोळीमुळे १० सेमी पेक्षा जास्त खोलवर नुकसान झाले आहे व ही गोळी मध्यभागातच अडकली आहे.

डॉ.सचिन गांधी म्हणाले,रोगनिदानासाठी गोळीचे मार्गक्रमण समजणे गरजेचे होते.गोळीने मध्यरेषा पार केल्यास प्राणघातक ठरू शकते. दोन्ही गोलार्धांच्या मध्यभागी असल्यामुळे मेंदूचा मध्यभाग व दोन्ही गोलार्धाला नुकसान पोचण्याची जोखीम असते.त्याचबरोबर मेंदूच्या पृष्ठभागावर असलेली सूज व मेंदूत असलेला रक्तस्त्राव या दोन्हींमुळे रूग्णाची परिस्थिती चिंताजनक होती.

या रूग्णाचे प्राण वाचविण्यामध्ये झटपट हालचाल करणं आवश्यक होतं. रूग्णाने हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यापासून ते शस्त्रक्रियेपर्यंतचा वेळ काही मिनिटांवर आणण्यात आला. रूग्णाला स्थिर करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. कवटीचा आतील दाब कमी करण्यासाठी डोक्याच्या कवटीचा भाग काढून मेंदूला विस्तारण्यासाठी जागा केली. हे जर केले नसते तर अजून त्रासदायक ठरले असते,कारण ब्लड प्रेशर संतुलित राहत नव्हते.

बुलेटपर्यंत पोहचणे हे पहिल्याच प्रयत्नात मात्र अवघड होते. त्यामुळे आम्ही रूग्णाची प्रकृती स्थिर होण्यासाठी २-३ दिवस दिले.यानंतर गोळी काढायला गुंतागुंतीची प्रक्रिया हाती घेतली. यात रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे डॉ.नानिवडेकर आणि टीम यांनी ३-डी इमेजिंग द्वारे गोळीची नेमकी जागा शोधण्यात मदत केली.रूग्णाच्या मेंदूतील परिस्थितीत बरेच चढउतार होते.ही तर पुढे उद्भवणाऱ्या नवीन गुंतागुंतींची सुरूवात होती. आठवडाभर ताप व पुढच्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले की मेंदूमध्ये गोळीच्या अवतीभवती फोड/गळू निर्माण झाला होता.त्यामुळे पुढचा संसर्ग वाचविण्यासाठी व हा गळू काढण्यासाठी आणखी एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

डिपार्टमेंट ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनच्या संचालिका डॉ.प्राची साठे म्हणाल्या , ज्यांना डोक्यामध्ये गोळी लागल्याने जखमा होतात,त्यांना स्थिर-स्थावर होण्यासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठविले जाते आणि मग त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते.मेंदूच्या शस्त्रक्रिया या योग्य वेळेत होणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या