हिंदू आणि ब्राम्हणांविरोधात आक्षेपार्ह लिखाण, मुंबईतून डॉक्टरला अटक

फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, मुंबई

फेसबुकवर हिंदूंविरोधात तसेच ब्राम्हणांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्या एका डॉक्टरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सुनीलकुमार निषाद असं या डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्याविरोधात विक्रोळीचे रहिवासी असलेल्या रवींद्र तिवारी यांनी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गेले दोन दिवस पोलीस निषाद यांचा शोध घेत होते. अखेर त्यांना दक्षिण मुंबईतून बुधवारी अटक करण्यात आली.निषाद यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याबाबत बोलताना पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी इंडियन एक्सप्रेसला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की तिवारी यांच्या तक्रारीच्या आधारे निषाद यांच्याविरोधात IPC च्या 295(A) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना जाणून बुजून दुखावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर निषाद यांना फोर्ट परिसरात मुंबई विद्यापीठाजवळून अटक करण्यात आली.

निषाद हे होमियोपथी डॉक्टर असून ते अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. या महिन्यामध्ये त्यांनी फेसबुकवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या काही पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या रवींद्र तिवारी यांनी सांगितले की गेली दोन वर्षे निषाद हे हिंदू आणि ब्राम्हणांविरोधात गरळ ओकणारं लिखाण करत होते. तिवारी आणि निषाद हे एकाच परिसरात राहतात. तिवारी यांनी निषाद यांना धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट फेसबुकवर अपलोड करू नका अशी विनंती केली होती. यावर निषाद यांनी तुम्हाला जर काही हरकत असेल तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा असं उत्तर दिल्याचं तिवारी यांचं म्हणणं आहे.

सहा महिन्यांपूर्वी देखील निषाद यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. निषाद यांनी भावना दुखावणारे लिखाण सुरूच ठेवल्याने तिवारी यांनी पुन्हा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी निषाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असं तिवारी यांनी सांगितलं आहे. निषाद यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी ईव्हीएम मशिनबाबत शंका उपस्थित केल्या आहेत शिवाय साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबाबतही आक्षेपार्ह लिखाण केल्याचं कळतंय.