डॉक्टर आणि विश्वासार्हता

फोटो प्रातिनिधीक

>>सुनील कुवरे

गेल्या काही दिवसांत सरकारी आणि महापालिका रुग्णालयांतील डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या. या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले. सरकारी आणि महापालिका रुग्णालयांची रुग्णसेवा विस्कळीत झाली. सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत रुग्णांच्या नातेवाईकांचे डॉक्टरांवरील हल्ले हा प्रकार अलीकडच्या काळात नेहमीचाच झाला आहे ही चिंताजनक बाब आहे. याकरिता राज्य सरकारने २०१० साली एक विशिष्ट कायदा केला. या कायद्यात डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्याला तीन वर्षे कारावास, अजामीनपात्र गुन्हा अशा तरतुदी आहेत. असा कायदा करूनही डॉक्टरांवरचे हल्ले सुरूच आहेत. गेल्या वर्षभरात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या ४७ घटना घडल्या आहेत. अशा घटना थांबण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांचे मूळ कारण समजून घेणे गरजेचे आहे.

धुळ्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरवर झालेला हल्ला अमानुष होता. डॉक्टरला आपला डोळा गमवावा लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, परंतु सर्वच रुग्णांचे नातेवाईक अशा हल्ल्याला जबाबदार असतात असे नाही. शिवाय डॉक्टरांना मारहाणीच्या घटना नेहमीच घडतात असेही नाही, पण केव्हा तरी अशी घटना घडली की, निवासी डॉक्टरांच्या संघटनांकडून त्याचे भांडवल केले जाते आणि संपाचे हत्यार उपसले जाते. डॉक्टरांवरील हल्ल्याचे कोणी समर्थन करणार नाही. कारण एका हाताने टाळी वाजत नाही. दोन्ही बाजूंनी विचार करावा लागतो. डॉक्टरांनीही रुग्णाबरोबर सामंजस्याने वागले पाहिजे. त्याला तत्काळ आवश्यक उपचार देणे गरजेचे आहे. कारण रुग्णाला डॉक्टरांकडून मिळणारी चांगली वागणूक हासुद्धा उपचाराचा एक भाग असतो, परंतु काही वेळा डॉक्टरांकडून रुग्णांना किंवा नातेवाईकांना दिली जाणारी वागणूकही तितकीच वाईट असते असे म्हटले तर चूक ठरू नये. कारण अलीकडे डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध आता इतके विकोपाला गेले आहेत की, कोणत्याही क्षणी ते बिनसतात आणि त्याचे रूपांतर डॉक्टरांवरील हल्ल्यात होते. वास्तविक रुग्णालयात जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा ती परिस्थिती योग्य प्रकारे हाताळणे ही रुग्णालय अधिष्ठाते आणि डॉक्टरांची जबाबदारी असते, पण तसे होत नाही.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला. वैद्यकीय व्यवसाय हा एक पवित्र पेशा मानला जातो. डॉक्टरांनी कामगारांप्रमाणे वर्तन करणे डॉक्टरांना शोभणारे नसून हे वर्तन डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारे आहे असे उच्च न्यायालयाने सुनावले, डॉक्टरांनी संप केल्यामुळे लाखो रुग्णांचे हाल झाले. संपाच्या काळात ३७७ जणांचा मृत्यू झाला. सर्वसामान्य रुग्णसेवेचा मूलाधार हा डॉक्टरच असतो, पण डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होतो. समाजात डॉक्टर ही एक प्रतिष्ठत व्यक्ती मानली जाते. पूर्वी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये एक प्रकारचे विश्वासाचे संबंध होते. रुग्ण हे डॉक्टरांना देवदूत मानत आणि डॉक्टरसुद्धा ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या आपल्या ब्रीदवाक्याला जपत असत. हे वातावरण आता नाहीसे झालेले आहे. त्याला कारणीभूत जसे डॉक्टर आहेत तसा समाजही आहे.

आजही समाजातील सर्वसामान्य, गरीब वर्गासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक आहेत. सार्वजनिक आरोग्य केंद्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालये आणि मुंबईच्या सायन, केईएम, नायर आदी रुग्णालयांमध्ये रुग्णांची दररोज प्रचंड गर्दी असते. रुग्णालयातील आंतरबाह्य कक्षात तर मोठय़ा प्रमाणात रुग्ण असतात. खरे तर ही गर्दी हे रुग्णांचा सरकारी आणि महापालिका रुग्णांवरील विश्वासाचे प्रतीक आहे. आज रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे डॉक्टरांवर ताण पडतो हे मान्य, परंतु रुग्णांनासुध्दा पूर्वीसारखी सेवा मिळत नाही. जी काही सेवा मिळते त्याचे पैसे भरावे लागतात. औषधे व इतर वस्तू रुग्णांना बाहेरून आणाव्या लागतात. काही वेळा सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी मशीन बंद असतात. त्यामुळे रुग्णांना बाहेरून काही चाचण्या करून घ्याव्या लागतात. सर्व परिस्थिती समजून रुग्णांनी किंवा नातेवाइकांनी वागले पाहिजे, पण ही अपेक्षा रुग्णांकडून कशी करता येईल याचा विचार डॉक्टर का करीत नाही? ग्रामीण भागात तर ही अडचण नेहमीच असते. डॉक्टरच जागेवर नसतात. निवासी डॉक्टरांवर रुग्णालये चालवली जातात. अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक चिडणे स्वाभाविक आहे. कारण सरकारी आणि महापालिका रुग्णालयांतील रुग्णांबद्दलची अनास्था या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. तेव्हा संप करून रुग्णसेवेचा दर्जा सुधारणार नाही. सरकार आणि महापालिकांनीसुद्धा आपल्या रुग्णालयांची बिकट अवस्था सुधारायला हवी. म्हणजे डॉक्टर-रुग्ण वादाचे प्रसंग कमी उद्भवतील.

आज वैद्यकीय व्यावसायिक नीतिमत्ता ढासळत आहे. रुग्णांना आलेले विपरीत रुग्णसेवेचे अनुभव चुकीचे मानता येतील का? याचा विचार डॉक्टरांनी करावा. आपल्या पेशाचे पावित्र्य आणि त्याविषयीचा आदर समाजात पुन्हा ठसविण्यासाठी काही ठोस प्रयत्न करायला पाहिजेत. रुग्णालयात आलेला कोणताही रुग्ण डॉक्टरांचा शत्रू नसतो किंवा कोणत्याही रुग्णाला मारण्याचा डॉक्टरांचा हेतू नसतो. मात्र कामाच्या अतितणावामुळे ते त्रस्त असतात. कारण शेवटी डॉक्टरसुद्धा माणूस आहे हे रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील ओळखले पाहिजे. डॉक्टरांनीसुद्धा हे लक्षात ठेवावे की, रुग्ण डॉक्टरांना देव मानतात. तेव्हा डॉक्टरांनी रुग्णालयात रुग्ण आल्यावर प्रथम रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्यांच्यात सद्भाव निर्माण करणे गरजेचे आहे. कारण मानवी जीवनात श्रद्धेला आणि विश्वासाला महत्त्व आहे. ही भावना दोघांमध्ये रूढ होईल तेव्हा रुग्णही पुन्हा डॉक्टरला देव मानू लागतील. असा प्रयत्न केला तर भविष्यात डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार कमी घडतील