म्युकरमायकोसिसवर संशोधन करण्याकरिता बिहारमधील डॉक्टर्स जळूंच्या शोधात

आयुर्वेदिक उपाचाराकरिता जळूचा वापर केला जातो. जळू म्हणजे एक असा किडा की, जो शरीरातील अशुद्ध रक्त शोषून घेतो आणि मृत पेशींना नष्ट करतं. आयुर्वेदात जळूंद्वारे उपचार करण्याच्या पद्धतीला जलयुका किंवा जळू उपचार पद्धती असे म्हटले जाते. सध्या बिहारमधील डॉक्टर रक्त शोषून घेणा-या जळूंचा शोध घेत आहेत.

पाटणा येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉक्टर रक्त शोषून घेणाऱ्या जळूंच्या शोधात आहेत. याचे कारण कोरोनाकाळात होणारा म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारांवर उपचारपद्धती शोधून काढणे हे डॉक्टरांकरिता एक आव्हान आहे तसेच सरकारने याकरिता कालाजार इंजेक्शनला परवानगी दिली असली तरीही आयुर्वेदिक डॉक्टरांना काळा बुरशीजन्य आजार जळू उपचार पद्धतीने बरा होईल, याची खात्री वाटत आहे. त्यामुळे या प्रयोगाकरिता पाटणातील आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांसह इतर लोकंही येथे जळूंना शोधत आहेत.

विषारी आणि बिनविषारी असे जळूंचे दोन प्रकार आहेत. आयुर्वेदिक उपचारांकरिता बिनविषारी जळूंची आवश्यकता असते. याबाबत पाटणा शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दिनेश्वर प्रसाद यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या बुरशीजन्य आजारांच्या उपचाराकरिता जलयुका म्हणजेच जळू उपचार ही अत्यंत प्राचीन उपचार पद्धती आहे. शरीरात कुठेही बुरशीजन्य आजार झाल्यास किंवा डोळ्यांनाही बुरशीमुळे सूज येत असल्यास जळू उपचार पद्धत फायदेशीर ठरते. डोळ्यांवर रक्त साखळल्यावर त्यावर जळू ठेवले जातात. हे जळू डोळ्यांजवळील अशुद्ध रक्त शोषून घेतात. यामुळे डोळ्यांवरील त्वचा पूर्ववत होते. कोरोना झालेल्या रुग्णांवरही याद्वारे कसे इलाज केले जातील, यावर संशोधन सुरू आहे. तसेच ग्लुकोमा झालेल्या रुग्णांवरही जलयुका पद्धतीद्वारे उपचार केले जातात, याला लाईन ऑफ ट्रिटमेंट असे म्हणतात.

मात्र असे असूनही या ब्लॅक फंगस या आजारावर जळू उपचार पद्धतीचे महत्त्व अजून कोणाला पटले नाही आणि सरकारनेही याला मान्यता दिलेली नाही, अशी माहिती आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश्वर प्रसाद यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या