ममता बॅनर्जीशी चर्चा करू, पण प्रसार माध्यमांसमोर; संपकरी डॉक्टरांची भूमिका

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांचा विचार करून आम्ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत, अशी भूमिका संपकरी डॉक्टरांनी घेतली आहे. मात्र, ही चर्चा बंद खोलीत न करता प्रसार माध्यमांसमोर करण्याची अट संपकरी डॉक्टरांनी ठेवली आहे. ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी आणि शनिवारी संपकरी डॉक्टरांना चर्चा करण्यासाठी बोलावले होते. मात्र, राज्यात दहशतीचे वातावरण असून भीती आणि सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार नसल्याची भूमिका संपकरी डॉक्टरांनी घेतली होती. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांशी संवाद साधावा असे डॉक्टरांनी म्हटले होते. मात्र, आता बॅनर्जी यांच्यासोबतच चर्चेला तयार असून प्रसार माध्यमांसमोर चर्चा करावी, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. मात्र, मुलाखतीची वेळ आणि ठिकाण ठरलेले नाही.

डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे राज्यातील संप मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्युनिअर डॉक्टरांनी शनिवारी रात्री संयुक्त परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करायला कधीही तयार आहोत. मुख्यमंत्री बॅनर्जी चर्चेसाठी एक हात पुढे करतील तर आमच्याकडून 10 हात पुढे येतील असे त्यांनी सांगितले. हा संप लवकरात लवकर मिटावा अशी आमची इच्छा आहे, असेही डॉक्टरांनी म्हटले होते. मात्र, ही चर्चा बंद खोलीत न करता प्रसारमाध्यमांसमोर व्हावी, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, त्यांनी लवकर काम सुरू करावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले होते. केंद्राने पश्चिम बंगाल सरकारला पाठवलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत त्या म्हणाल्या, अशा सूचना उत्तर प्रदेश आणि गुजरातलाही पाठवण्यात याव्यात. तेथे काही वर्षांपासून हिंसाचार सुरू आहे. राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून डॉक्टरांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहेत.