दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे स्मार्ट ग्राम

85

सामना ऑनलाइन, दोडामार्ग

राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने चालू वर्षापासून सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत तळकोकणात अव्वल क्रमांक पटकावत दोडामार्ग तालुक्यातील ‘पहिले स्मार्ट ग्राम’ होण्याचा बहुमान आयनोडे–हेवाळे ग्रामपंचायतने पटकावला.

विकासकामांत ग्रामपंचायतींचा सहभाग करून घेत समृद्ध ग्राम घडविण्यासाठी सुरू झालेल्या या योजनेत लोकसहभागातून सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे हेवाळे गावचे सरपंच यांची मेहनत यानिमित्ताने फळास आली आहे. तालुक्यात अव्वल आल्यानंतर हेवाळे ग्राम आता जिल्हा स्मार्ट ग्रामसाठी सज्ज झाले आहे. लोकसहभागातून शासनाने यापूर्वी राबविलेल्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेचे रूपांतर करून राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी चालू वर्षापासून स्मार्ट ग्राम योजना अमलात आणली आहे.

लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखणे, त्यातून समृद्ध ग्राम निर्माण करणे, राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ग्रामस्तरीय योजनांची सांगड घालून योजनांचा समन्वय करणे आदी उद्देश समोर ठेवत ही योजना शासनाने अमलात आणली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना या योजनेत सहभाग मिळाला होता. त्यानंतर झालेल्या तालुकास्तरीय समितीने तपासणी करून सदर अहवाल जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीं सिंधुदुर्ग जिल्हय़ातील तालुकानिहाय प्रथम स्मार्ट बनलेल्या गावांची नावे घोषित केली. यात दोडामार्ग तालुक्यातून विविधांगी उपक्रम राबवून पंचायतराजमध्ये लक्षणीय काम केलेल्या हेवाळे ग्रामला प्रथम स्थान मिळाले.

दरम्यान हेवाळे ग्रामचे सरपंच संदीप देसाई यांनी आपल्या ग्रामला दोडामार्ग तालुक्यातून पहिले स्मार्ट ग्राम होण्याच्या मिळालेल्या बहुमानाबाबत समाधान व्यक्त केले. आपल्यासोबत आपले ग्रामस्थ या यशाचे खरे शिलेदार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली असून पंचायतराजमध्ये लोकसहभाग खूप महत्त्वाचा असून लोकसहभागातूनच गावचा सर्वांगीण विकास घडू शकतो हे आमच्या ग्रामवासीयांनी दाखवून दिल्याचे ते म्हणाले. आमचे सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रा.पं. कर्मचारी आणि तालुकास्तरीय अधिकारी यांचे योग्य मार्गदर्शन यामुळे आम्ही आता जिल्हा स्मार्ट ग्रामसाठी मेहनत घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. हेवाळे ग्रामच्या या स्मार्ट यशाबाबत सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. याच वर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात दोडामार्ग तालुक्यात प्रथम तर संत वनग्राम योजनेत हेवाळे ग्रामला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या