मोकाट कुत्र्यांनी घेतला दोन वर्षाच्या चिमुकलीचा बळी

संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. कुत्र्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली असून, या मोकाट कुत्र्यांनी दोन वर्षाच्या चिमुकलीचा बळी घेतला. मुकुंदवाडी जे सेक्टर येथील चिमुकली आकांक्षा राजू वावरे हिचा मोकाट कुत्रा चावल्याने बुधवारी मृत्यू झाला.

शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. रस्तोरस्ती व गल्लोगल्लीत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, नागरिकांवर धावून जाणे, बालकांना चावा घेऊन जखमी करणे, रस्त्यावरच जोरजोरात भुंकणे यामुळे नागरिकांमध्ये कुत्र्यांची दहशत पसरली आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी मनपाने नवीन एजन्सीची नियुक्ती केली आहे. परंतु कुत्रे पकडण्याची कारवाई संथ गतीने होत असल्यामुळे कुत्र्यांचा त्रास कमी झालेला नाही. कुत्रे पकडण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली असली तरी ही पथके शहरात फिरत नसल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी कुत्र्याने चावा घेतल्यामुळे दोन बालकांचा मृत्यू झाला आहे, तर 70 जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. तरीदेखील कुत्र्यांना आळा घालण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे.

मुकुंदवाडी येथे घरासमोर खेळणाऱ्या आकांक्षा हिला 25 ऑगस्ट रोजी मोकाट कुत्रा चावला होता. त्यानंतर तिला येथील घाटी रुग्णालयामध्ये रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र दोन-तीन दिवसांमध्ये तिची प्रकृती बिघडल्याने हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तिला रेबिजची लागण झाल्याचे सांगितले होते. काल रात्री तिच्या नाकातोंडातून फेस येऊ लागला आणि पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. ती एकुलती एक मुलगी होती.

आपली प्रतिक्रिया द्या