कुत्र्याने चिमुरडीच्या मृतदेहाचे लचके तोडले, उत्तर प्रदेशमधील सरकारी रुग्णालयातील घटना

कुत्रा एका चिमुरडीच्या मृतदेहाचे लचके तोडत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात गुरूवारी घडलेली ही ह्रदयद्रावक घटना आहे. त्या मृतदेहाजवळ कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याचे पाहून कुत्र्याने त्या मृतदेहाचे लचके तोडले.

सरकारी रुग्णालयात स्ट्रेचरवर एका मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आला होता. जिन्याखाली ठेवण्यात आलेल्या या मृतदेहाजवळ कोणी नसल्याने तिच्या मृतदेहाचे कुत्र्याने लचके तोडले. एका अपघातात जीव गमावलेल्या त्या मुलीचा तो मृतदेह होता. रुग्णालयात उपचार करण्याआधीच त्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता.

रुग्णालयात आणल्यानंतर जवळपास दोन तास तिच्यावर उपचारच करण्यात आले नाहीत असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मात्र रुग्णालयाच्या प्रशासनाने या आरोपाचे खंडन केले आहे. सर्व तपासणी झाल्यावर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला होता, त्यांनीच तो मृतदेह तिथे ठेवला होता, असे रुग्णालयाच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या