कुत्र्याने मटण खाल्ल्याने बापाने मुलीला ठार मारले

एका अतिशय किरकोळ कारणासाठी बापाने मुलीला गोळी घालून ठार मारले आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आईला अटक केली असून मयत मुलीचा बाप फरार झाला आहे.

धारशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालक्यातील कार्ला इथे ही घटना घडली आहे. काजल मनोज शिंदे ही तिच्या नवऱ्यासह आई-वडिलांच्या घरी राहात होती. रविवारी काजलने सगळ्यांसाठी मटण बनवलं होतं. मटण बनवल्यानंतर ती इतर कामं करत असताना हे मटण कुत्र्याने खाल्लं. हा प्रकार काजलची आई म्हणजेच मीराने पाहिल्यानंतर ती काजलवर जाम भडकली होती. या शुल्लक कारणामुळे काजल आणि तिच्या आईचं कडाक्याचं भांडण झालं. भांडण ऐकून दारूच्या नशेत असलेला काजलचा बाप गणेश झंप्या भोसलेही तिथे आले. दारूच्या नशेतच त्याने बंदूक काढली आणि काजलवर गोळी झाडली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या काजलचा जागीच मृत्यू झाला होता. काजलच्या मृत्यूनंतर तिचा नवरा मनोज याने पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरु केला आहे.