Video : …आणि बाप्पाच्या हातातला मोदक कुत्र्याने पळवला!

सोमवारपासून सर्वत्र गणेशोत्सवाचं मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे. घराघरात विराजमान होणारे बाप्पा जसे आबालवृद्धांना मोहात पाडतात, तसे ते घरातल्या पाळीव प्राण्यांनाही प्रिय असतात. फक्त या प्राणीजनांची बाप्पावरच्या प्रेमाची कारणं थोडी वेगळी असतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खाऊ. बाप्पासाठी येणारे मोदक, पेढे, बर्फी इत्यादी मिठाया दुधापासून बनलेल्या असतात आणि दूध हा घरातील कुत्र्यामांजरांचा आवडता खाऊ आहे. असाच बाप्पाच्या हातावर ठेवलेल्या मोदकाला कुत्र्याने पळवून नेतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

फेसबुकवरील डॉग्ज डे आऊट या प्राणीप्रेमी ग्रुपवर चेतना तडाखे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांच्या घरातील डोडो ही पाळीव कुत्री या व्हिडीओत बाप्पाच्या हातातला मोदक हळूच पळवून नेताना दिसत आहे. ”डोडो ही खाऊप्रेमी असून ती अत्यंत चलाखीने बाप्पाच्या हातातला मोदक पळवते. आज तिला रंगेहाथ पकडलं आहे..” अशी गमतीशीर कॅप्शनही तडाखे यांनी या व्हिडीओला दिली आहे. हा व्हिडीओ तुफान लोकप्रिय होताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या