धक्कादायक… सरकारी रुग्णालयाच्या परिसरात कोरोनाबाधिताच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके

1233

आंध्र प्रदेशच्या ओंगोले येथील शासकीय रुग्णालयात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीच्या मृतदेहाचे कुत्रे लचके तोडत असल्याचे रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांना आढळले. त्यांनी कुत्र्यांना हाकलले आणि मृतदेहाची राहणी केली. तेव्हा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याच्या खुणा मृतदेहाच्या चेहऱ्यावर होत्या. तसेच त्याचा एक कानही कुत्र्यांनी ओरबाडला होता. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) रुग्णालयात ही घटना घडली. विशेष म्हणजे तो मृतदेह कोरोनाबाधित रुग्णाचा असल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल का केले नव्हते. रुग्णालय परिसरात असलेल्या बेघरांसाठी असलेल्या शेडमध्ये तो का राहत होता, असे सवाल उपस्थित होत आहेत. त्याच्या कटुंबियांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

कंठा राव अशी मृताची ओळख पटली असून ते प्रकाशम जिल्ह्यातील झारुगुमली मंडल, बितरगुंटा गावातील रहिवासी होते. रुग्णालयाने राव यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कंठा राव यांच्या नातेवाईकांनी केल्यानंतर घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासणीत राव यांना रुग्णालयात दाखल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कंठा राव यांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांचे रिम्सचे अधीक्षक डॉ. श्रीरामुलू यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले की, रुग्णालयाच्या नोंदीनुसार कंठा राव यांना रुग्णालयात दाखल केले नव्हते. रुग्ण किंवा बाह्यरुग्ण म्हणून त्यांची कोणतीही नोंद नाही. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 5 ऑगस्टला रूग्णवाहिकेने त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलेच नाही. रुग्णालयात त्यांची कोणतीही नोंद नाही. ते बेघरांसाठी असलेल्या शेडमध्येच राहत होते. तसेच त्यांना रुग्णालयात कोणीही भेटायला आल्याची नोंद नाही, असेही डॉ. श्रीरामुलू म्हणाले. रुग्णालयाने त्यांना प्रवेश नाकारला का किंवा त्यांना कोणत्याही उपचाराशिवाय पाच दिवस बेघरांसाठी असलेल्या शेडमध्ये का झोपायला लागले, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. एका रुग्णावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे सोमवारी सुरक्षा रक्षकांनी पाहिले. त्यांनी कुत्र्यांना हाकलून रुग्णाची पाहणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले. तसेच कुत्र्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा केल्या होत्या. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्याचे डॉ. श्रीरामुलू यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते चंद्रबाबू नायडू यांनी मृतदेहाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही घटना म्हणजे मानवाधिकाराच्या उल्लंघनाची गंभीर घटना आहे. एखाद्या कोरोनाबाधिताच्या मडतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडण्यासारखी गंभीर घटना घडणे, हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या