डोंबिवलीत ‘एसी’ लोकलच्या दरवाजाचा लोच्या, प्रवाशांची जबरदस्त रेटारेटी

डोंबिवली रेल्वे स्थानकात आज सकाळीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद एसी लोकल कल्याणहून डोंबिवली स्थानकात दाखल झाली. मात्र, नेहमीपेक्षा दुप्पट झालेल्या गर्दीमुळे डब्यात चढण्यासाठी मोठी झुंबड उडाली. एसी डब्यांमध्ये दरवाजाजवळ प्रवाशांची जबरदस्त रेटारेटी सुरू होती. अनेक प्रवासी आत शिरण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे दरवाजे बंद होण्यास अडथळा निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच रेल्वे सुरक्षा बल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजात लोंबकळत असलेल्या प्रवाशांना खेचून बाहेर काढले.

‘त्या’ जीवघेण्या वळणावर ट्रेनचा वेग मंदावला

मुंब्य्रात सोमवारी झालेल्या भयंकर दुर्घटनेनंतर ‘त्या’ जीवघेण्या वळणावर ट्रेनचा वेग अखेर मंदावला आहे. मध्य रेल्वेने याबाबतचे सूचना पत्रक जारी केले आहे. मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गांवर गाडीचा वेग सुमारे सरासरी 35 किलोमीटर प्रति तास असतो तर जलद मार्गावर तो 40 ते 45 किलोमीटर प्रति तास इतका असतो. मुंब्य्रातील ‘त्या’ जीवघेण्या वळणावर समोरासमोरून येणाऱया लोकलमधील अंतर अत्यंत कमी होते. त्यामुळेच दारात लटकणाऱया प्रवाशांचे एकमेकांना धक्के लागून त्यांचे बळी गेले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने फास्ट ट्रकवर असलेल्या ‘त्या’ जीवघेण्या वळणावरील वेगमर्यादा 35 किलोमीटर प्रति तास केली आहे.