गुजराती दुकानदाराची मराठी दुकानदाराला बेदम मारहाण, डोंबिवलीतील संतापजनक घटना

डोंबिवली पूर्व येथे एक संतापजनक प्रकार घडला आहे. येथे एका गुजराती दुकानदाराने त्याच्या दोन मुलांसह बाजूच्या मराठी दुकानदाराला आणि त्याच्या दोन महिला नातेवाईकांना बेदम मारहाण केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत रामनगर पोलीस ठाण्यामध्ये दुकानदार आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. मात्र अद्याप पोलिसांनी त्या तिघांना अटक न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मंगळवारी डोंबिवली स्टेशन रोडवरील एका मराठी दुकानदार आणि त्याच्या दोन महिला नातेवाईकांना बाजूच्या गुजराती दुकानदारांनी आणि त्यांच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळावरी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

डोंबिवली पूर्वेला स्टेशन बाहेर असणाऱ्या मार्गावर राजेंद्र शेलार यांचे कपडे तसेच इतर साहित्याचे दुकान आहे. याच दुकानाच्या शेजारी देवराज पटेल दुबरिया यांचे देखील दुकान आहे. देवराज पटेल दुबरिया हे आपल्या दुकानातील कपड्यांचा पुतळा (मॅनेक्वीन) वारंवार शेलार यांच्या दुकानाला खेटून ठेवत होते. अनेकदा विनंती करून सुद्धा देवराज यांनी तो पुतळा हटवला नव्हता. मंगळवारी पुन्हा एकदा देवराज यांनी दुकानाला खेटून पुतळा ठेवला. ते पाहून राजेंद्र शेलार यांनी दुबरिया यांना पुतळा बाजूला हटवा असे सांगितले. या कारणावर चिडलेले देवराज दुबरिया, त्यांचे दोन मुलगे मयूर आणि प्रितेश यांनी शेलार तसेच त्यांच्या पत्नी सुवर्णा आणि मेहुणी अंजना यांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत स्वतः राजेंद्र शेलार, पत्नी सुवर्णा आणि मेहुणी अंजना जखमी झाल्या आहेत. तर शेलार यांच्या दुकानातील सामानाचे देखील नुकसान झाले आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपी देवराज दुबरिया, मयूर दुबरिया आणि प्रितेश दुबरिया यांच्या विरोधात कलम 452, 324, 323, 427 आणि 34 प्रमाणे रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.