घरगुती वादात दिराने भावजयीचे कापले नाक

47

सामना प्रतिनिधी । पालम

दिर आणि भावजयीच्या घरगुती वादावरून सुरू झालेल्या भांडणाचे पर्यवसान भावजयीचे नाक कापण्यात झाले. ही घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव चौकात घडली.
रंजना चिंगले या आपल्या मुलांना घेऊन त्यांचे भाऊ रघुनाथ किशन आराटे (रा. पारडी बु. ता. वसमत) याच्यासोबत माहेरी निघाल्या होत्या. ही माहिती रंजनाचे दीर उमाकांत नागोराव चिंगले याला समजली. पालम शहरातील पेठपिंपळगाव चौकात चिंगले याने दोघांनाही गाठले. माझ्या भावाच्या अपरोक्ष मुलांना घेऊन कुठे निघालीस असा जाब त्याने विचारला असता तेथेच रस्त्यावर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर संतापलेल्या धाकट्या दिराने भावजय आणि तिच्या भावाला लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत रंजना चिंगले व रंजनाचे दीर उमाकांत नागोराव चिंगले गंभीर जखमी झाले. झटापटीत रंजना यांच्या नाकावर जोरदार वार झाल्याने त्यांचे नाक तुटले. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी रघुनाथ किशन आरोटे यांच्या फिर्यादीवरुन उमाकांत नागोराव चिंगले (रा. गुंडेवाडी ता.गंगाखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास जमदार मदन सावंत, गोविंद चुडावकर करीत आहेत अशीही माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर तरडे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या