सिंधू बनली इंडिया ओपनची राणी, ऑलिम्पिकच्या पराभवाचा वचपा काढला

14

नवी दिल्ली :

रिओ ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे रौप्य पदकावरच समाधान मानावे लागणाऱ्या हिंदुस्थानच्या पी. व्ही. सिंधू हिने रविवारी इंडिया ओपन बॅडमिंटनमधील जेतेपदाच्या लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा सलग दोन गेममध्ये धुव्वा उडवून त्या पराभवाची परतफेड केली आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याचा मान संपादन केला. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने ही लढत २१-१९, २१-१६ अशा फरकाने जिंकली.

पी. व्ही. सिंधू आणि कॅरोलिना मरीन यांच्यामधील लढतीची जगभरातील तमाम क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट बघत होते. दोघांमधील लढत झालीही रोमहर्षक. पहिल्या गेममध्ये दोघींमध्ये चुरशीची लढाई झाली. अखेर दबावाखाली पी. व्ही. सिंधूने आपला खेळ उंचावला आणि २१-१९ अशा फरकाने तो गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये कॅरोलिना मरीन झोकात पुनरागमन करील असे वाटत होते. तिने चांगली कामगिरीही केली पण पी. व्ही. सिंधूच्या जबरदस्त खेळासमोर तिचा निभाव लागला नाही. अखेर २१-१६ अशा फरकाने हा गेम जिंकून हिंदुस्थानच्या या फुलराणीने स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली.

दरम्यान, या आधी पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानच्याच सायना नेहवालचा सरळ दोन गेमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. शनिवारी या कन्येने कोरियाच्या सुंग ह्यून हिचा २१-१८, १४-२१, २१-१४ अशा फरकाने पराभव केला.

व्हिक्टरची व्हिक्टरी

व्हिक्टर ऍक्सेलसेन याने चोव चेनला पराभूत करून पुरुषांच्या एकेरीच्या जेतेपदावर रुबाबात मोहर उमटवली. हे त्यांचे पहिलेच इंडिया ओपनचे जेतेपद ठरले हे विशेष. दुसरे सीडेड ली कुई व ह्य़ुवांग याकिंग यांनी सलग दुसऱ्यांदा मिश्र दुहेरीच्या अजिंक्यपदाला मिठी मारली. महिला दुहेरीत शिहो तनाका व कोहारू योनेमोटो यांनी पहिल्यांदाच महिला दुहेरीचा झळाळता करंडक पटकावला.

आपली प्रतिक्रिया द्या