90 दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करा, डोनाल्ड ट्रम्प यांचं फर्मान

821

जगाला कोरोना नावाच्या महामारीच्या खाईत ढकलणाऱ्या चीनविरुद्ध असंतोष बळावत असल्याचं चित्र आहे. त्याचा फटका आधीच चिनी कंपन्या आणि अॅप्लिकेशनला बसला आहे. आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकची अमेरिकेतील संपत्ती विकण्याचे आदेश दिले आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वीचॅट या अॅप्लिकेशनच्या चिनी मालकांसोबत व्यवसाय करण्यास प्रतिबंध घातला होता. ही दोन्ही अॅप्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा, परदेश धोरण आणि अर्थव्यवस्थेला घातक असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. आता ट्रम्प यांनी टिकटॉकची मालक असलेल्या बाईट डान्स या चिनी कंपनीला अमेरिकेतून गाशा गुंडाळण्यासाठी नव्वद दिवसांचा अवधी दिला आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेतील टिकटॉकची जितकी संपत्ती असेल, तितकी विकण्याचे आदेश जारी केले आहेत. माझ्याकडे असे सबळ पुरावे असून ज्यांच्या आधारे बाईटडान्स ही कंपनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक ठरू शकते, असं सिद्ध होत आहे. त्यामुळे हा अवधी त्यांना देण्यात येत असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. टिकटॉकमधून डेटा गोळा केला जात असून त्याचा देशाच्या सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेला धोका आहे, असे स्पष्ट करीत ट्रम्प यांनी चीनविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

याआधी हिंदुस्थानने सर्वप्रथम टिकटॉक आणि वुईचॅटला देशातून हद्दपार केले आहे. चीनच्या जवळपास 106 ऍप्सवर हिंदुस्थानने बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात चीन आणि हिंदुस्थानच्या सैन्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर देशभरात चीन विरोधात संतापाची लाट उसळली होती. त्याचा केंद्रसरकारवरही मोठा दबाव होता.

आपली प्रतिक्रिया द्या