‘मी परत आलोय’, ट्विटरनंतर फेसबुक आणि युट्यूबवरही डोनाल्ड ट्रम्प यांचे कमबॅक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि युट्यूब अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर फेसबुकवर ‘मी परत आलोय’ (I’M BACK!) अशी एक पोस्ट लिहून त्यांनी आपण परतल्याचे सांगितले. याआधी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचे ट्विटर अकाउंटही सुरू करण्यात आले होते.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने 25 जानेवारी, 2023 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंट पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. लोकांना राजकारणात सक्रीय असलेल्यांना ऐकण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे, परंतु जर ट्रम्प यांनी यापुढे कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्याविरुद्ध अधिक कठोर कारवाई केली जाईल, असेही यावेळी कंपनीने म्हटले होते.

दरम्यान, 6 जानेवारी, 2021मध्ये कॅपिटॉल हिंसाचारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया अकाउंट बंद कररण्यात आली होती. मात्र आता ट्विटर पाठोपाठ फेसबुक आणि युट्यूबवरील त्यांचे अकाउंट सुरू करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांना 23 मिलियन, तर फेसबुकवर 34 मिलियन लोक फॉलो करतात. तर ट्विटरवर तब्बल 87.4 मिलियन लोक त्यांना फॉलो करतात. 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.