निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी रचला होता उठावाचा कट, हिटलरप्रमाणे केला होता चिथावण्याचा प्रयत्न

राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हरल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उठावाची पूर्ण तयारी केली होती. अशी परिस्थिती उद्भवल्यास कोणत्याही परिस्थितीत त्यांना रोखायचेच असे मी सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले होते असे अमेरिकेतील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे. वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार फिलीप रकर आणि कॅरोल लेओनिंग या दोघांनी पुस्तक लिहिलं आहे. I Alone Can Fix It: Donald J. Trump’s Catastrophic Final Year.असं या पुस्तकाचं नाव असून त्यामध्ये ट्रम्प निवडणूक हरल्यानंतर घडलेल्या घटनांचा मागोवा घेण्यात आला आहे.

या पुस्तकामध्येच जाँईट चीफ ऑफ स्टाफचे प्रमुख जनरल मार्क मिली यांची वाक्ये उद्धृत करण्यात आली आहेत. ‘त्यांना प्रयत्न करू दे मात्र ते (शिवी हासडत) यशस्वी होऊ शकणार नाही’ असं मिली यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलताना म्हटल्याचं पुस्तकात लिहिलं आहे. उठाव सैन्याशिवाय होऊ शकत नाही. एफबीआय, सीआयए शिवाय उठाव होऊ शकत नाही, कारण आपणच बंदूकधारी मंडळी आहोत’ असं मिली म्हटल्याचंही पुस्तकात लिहिलं आहे.

6 जानेवारीला अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थक घुसले होते. त्या दिवशी मोठा हिंसाचार भडकला होता. असा हिंसाचार अमेरिकेने आजपर्यंत कधीही पाहिला नव्हता. या हिंसाचाराच्या काही दिवस आधीच मिली यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना असं काहीतरी घडू शकतं याची कल्पना दिली होती. मिली यांनी ट्रम्प यांचे त्यावेळचे वर्तन हे हिटलरप्रमाणे होते असं सांगण्याचाही मिली यांनी प्रयत्न केला. ट्रम्प हे ‘फ्युरर’ प्रमाणे बोलत असल्याचं मिली यांचं म्हणणं होतं. कॅपिटॉल हिंसाचाराचं वर्णन मिली यांनी ‘brownshirts in the streets म्हणजेच रस्त्यावरील खाकीवर्दी वाले असं केलं होतं. ब्राऊनशर्ट हे नाझींचे निमलष्करी दल होते.

1933 साली जर्मनीतील संसद राईकस्टाग पेटवून देण्यात आलं होतं. हे कृत्य कम्युनिस्टांचे असल्याचा आरोप करत आता कठोर शासकाची जर्मनीला गरज असल्याचं हिटलरने प्रचार करायला सुरुवात केली. यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याने जर्मनीवर वर्चस्व मिळवलं होतं. असाच काहीसा प्रयत्न ट्रम्प यांना करायचा होता. पुस्तकात म्हटलंय की मिली यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं की ‘ट्रम्प हे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा फायदा उठवत सैन्याला पाचारण करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.’

या सगळ्या प्रयत्नात जे आडवे जातील असं वाटलं त्या सगळ्यांना ट्रम्प यांनी पदावरून हटवलं किंवा त्यांची बदली करण्यात आली. संरक्षण सचिव मार्क एस्पर यांच्याजागी क्रिस्तोफर मिलर यांना आणण्यात आलं. ट्रम्प यांचे विचार न पटणाऱ्या एस्पर यांच्या सहकाऱ्यांनाही हटवण्यात आलं होतं. अॅटॉर्नी जनरल विल्यम बार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ट्रम्प यांनी मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता, त्याला अनुमोदन देण्यास नकार देत बार यांनी राजीनामा दिला होता. या सगळ्या घटनांमुळे मिली चिंतेत पडले होते. मिली यांनी ट्रम्प यांचे वर्णन काहीही गमावण्यासारखे नसलेला हुकूमशहा असं केलं होतं. सोबतच त्यांनी ट्रम्प यांची तुलना हिटलर याच्याशी केल्याचंही पुस्तकात लिहिलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या