ट्रम्प महाशयांसमोर दारिद्रय दिसू नये म्हणून…45 कुटुंबांना झोपड्या सोडण्याचे आदेश

497

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदुस्थान दौऱयासाठी गुजरातमध्ये भाजप सरकारने श्रीमंती दाखविण्याचा आटापिटा सुरू केला आहे. ट्रम्प महाशयांसमोर भिकारडेपणा नको, असे फर्मानच काढण्यात आले आहे. अहमदाबाद येथील मोटारा स्टेडियम येथे ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या मैदानाजवळच्या परिसरात 20-25 वर्षांपासून राहणाऱया 45 गरीब कुटुंबांना झोपडय़ा, घरे सोडून जाण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

पुढील आठवडय़ात 24 फेब्रुवारीला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हिंदुस्थान भेटीवर येत आहेत. गुजरातपासून हा दौरा सुरू होत आहे. यावेळी अहमदाबाद येथे ट्रम्प यांचा रोड शो होणार आहे. या मार्गावरील झोपडय़ा लपविण्यासाठी मोठी भिंत बांधण्यात आली. यावरून सोशल मीडियासह सर्वत्र टीका होत असतानाच भाजप सरकारने पुन्हा गरीबांना बेघर करण्याचा घाट घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या तीन तासांच्या दौऱ्यासाठी केंद्र आणि गुजरात सरकार तब्बल 100 कोटी रुपयांची उधळपट्टी करणार आहे.

  • अहमदाबादेतील मोटारा स्टेडियमचे उद्घाटन ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे. तसेच ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोटारा स्टेडियमजवळ वर्षांनुवर्षे 200 गरीब कुटुंबीय झोपडय़ा आणि लहान घरांमध्ये राहतात. यातील 45 जणांना सात दिवसांच्या आत झोपडय़ा रिकाम्या करा, अशा नोटिसा अहमदाबाद महापालिकेने बजावल्या आहेत. गरीब कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आपली प्रतिक्रिया द्या