अमेरिकेचा डोळा हिंदुस्थानी बाजारपेठेवर; ट्रम्प यांच्या दौऱ्याचा लाभ अमेरिकेलाच

640

अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदुस्थान दौऱ्याला आता काही तासच उरले आहेत. या दौऱ्याची जोरदार तयारी हिंदुस्थानने केली आहे. ट्रम्प हिंदुस्थान भेटीसाठी प्रचंड उत्सुक आहेत. आशिया खंडात चीनला शह देण्यासाठी त्यांना हिंदुस्थानची साथ मोलाची आहे. शिवाय याच वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 28 ते 30 लाख हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांची मते ट्रम्प यांना आपल्याकडे वळवायची आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या हिंदुस्थानी बाजारपेठेत अमेरिकन मालाला चढ्या भावाने प्रवेश मिळावा याच मुख्य हेतूने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या दौऱ्याचे आयोजन महासत्तेच्या हेतूने केले आहे.

ट्रम्प यांच्या हिंदुस्थान भेटीत इंडो -अमेरिकन व्यापारी करार होणार का आणि या करारातून हिंदुस्थानच्या पदरात काय पडणार हेही ट्रम्प यांच्या भेटीनंतर स्पष्ट होणार आहे. हिंदुस्थानी बाजारपेठेत अमेरिकन मालाला कायमस्वरूपी स्थान मिळावे, या मालावरील करात सवलत मिळावी यासाठी अमेरिका विशेष प्रयत्न करणार हे उघड आहे. शिवाय आशिया खंडातील हिंदुस्थानच्या दबदब्याचा लाभ घेत महासत्ता चीनला शह देता येईल याची जाण अमेरिकेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दौरा व्यापारी लाभाच्या दृष्टीने अमेरिकेसाठीच फायद्याचा ठरणार असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दृढ मैत्री जगाला ठाऊक आहे. त्याच मैत्रीचा लाभ ट्रम्प यांना त्यांच्या निवडणुकीत होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या