डोनाल्ड ट्रम्प हे मानसिकदृष्ट्या असंतुलीत व्यक्तीमत्त्व – प्रा. पीटर कुझनिक

29

सामना ऑनलाईन । नागपूर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मानसिकदृष्ट्या असंतुलीत व्यक्तीमत्त्व आहे. अशा व्यक्तीच्या हाती अण्वस्त्रे असणे ही केवळ अमेरिकेकरिताच नाही तर संपूर्ण जगाकरिता अत्यंत धोकादायक गोष्ट असून जग सध्या एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहचले आहे, असे मत अमेरिकन युनिव्हसिटीच्या आण्विक अभ्यास विभागाचे संचालक आणि इतिहासाचे प्राध्यापक पीटर कुझनिक यांनी व्यक्त केले.

टिळक पत्रकार भवनतर्फे आयोजित पत्रकारांशी वार्तालाप या कार्यक्रमात ते बोलत होते. कुझनिक यांनी ट्रम्प यांच्या आण्विक धोरणांचा विरोध केला. ते म्हणाले, देशादेशातील आण्विक स्पर्धेमुळे आज जग धोकादायक वळणावर पोहचले आहे. ट्रम्प आणि किंग जोम सारखे नेते आज जगात अत्यंत महत्त्वपूर्ण पदावर आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी अणू युद्ध पेटू शकते. हिरोशिमामध्ये झालेल्या नरसंहारापेक्षा कितीतरी पट जास्त नरसंहार करू शकणारी आण्विक अस्त्रे आज विकसित झाली आहे. दुदैर्वाने अमेरिका आणि रशीया यांच्याकडेच सगळ्यात जास्त घातक अस्त्रे आहेत. जगातील ९३ टक्के आण्विक अस्त्रे याच दोन्ही देशांकडे आहेत. या अस्त्रांचा वापर झाल्यास अवघ्या पृथ्वीचा विनाश अटळ आहे.

सेंट्रल इनव्हेस्टिगेटींग एजन्सी (सीआयए)च्या स्थापनेपासूनच अमेरिकेने शस्त्रांच्या भर‌वशावर जग पादाक्रांत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ट्रम्प यांच्यापूर्वीपासूनच आण्विक अस्त्रांच्या विकासाकरिता मोठा खर्च केला जात आहे. त्यामुळे एकट्या ट्रम्पच्या पायउतार होण्याने अमेरिकेचे आण्विस्त्रांबाबतचे धोरण बदलणार नाही, याची कबुली त्यांनी यावेळी दिली. परंतु ट्रम्प सारखी व्यक्ती सत्तेत नसल्यास युद्धाची शक्यता मात्र नक्कीच कमी होऊ शकते, असेही ते म्हणाले.

ट्रम्प हा अनेकदा कर्जबाजारी झाला आहे. अमेरिकेतील बँकांनी त्याला अनेकदा कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्या काळात रशीयाने त्याला पैसा पुरविल्याचा आरोप यावेळी कुझनिक यांनी केला. दशहतवाद्यांच्या हाती अण्वस्त्रे लागण्याच्या भितीबाबत ते म्हणाले तसे झाल्यास जगाचा विध्वंस निश्चितच आहे. परंतु ट्रम्प आणि किंग जोम सारख्या राजकारण्यांच्या हाती या शस्त्रांचे रिमोट असणे तेवढेच धोकादायक आहे. माझा वाढत्या आण्विक स्पर्धेला विरोध असून प्रत्येक देशातील नागरिकांना आण्विक कार्यक्रमाला प्रतिबंध घालण्यासाठी आपल्या सरकारवर दबाव आणावा, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी रेल्वे ट्रेड युनियनचे जे. नारायण राव आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे जोसेफ राव उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या