ट्रम्प फेब्रुवारीत हिंदुस्थान दौऱ्यावर येणार ?

468

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. या आमंत्रणाचा स्वीकार करून ट्रम्प हे हिंदुस्थान दौऱ्यावर फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटी हा दौरा होण्याची शक्यता असून त्याच्या तारखा अजून निश्चित झालेल्या नाहीत असं सांगण्यात आलं आहे.

हिंदुस्थानातील सरकारी अधिकाऱ्यांनी काही माध्यमांना या दौऱ्यासंदर्भातील माहिती देताना सांगितले की अमेरिकेतील काही घडामोडींमुळे तारखा निश्चित झालेल्या नाहीत. ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग खटला चालण्यात येणार असल्याचं कळतंय. तारखा निश्चित न होण्याचे हे मुख्य कारण आहे. हिंदुस्थानातील अमेरिकेच्या दुतावासाने या दौऱ्याबाबत माहिती देण्यास नकार दिला असून अधिक माहितीसाठी व्हाईट हाऊसशी संपर्क साधण्यास माध्यम प्रतिनिधींना सांगण्यात आले आहे.

ट्रम्प यांच्यासमोर त्यांच्या देशात असलेल्या अडचणींप्रमाणेच नागरिकत्व संशोधन कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरून देशात असलेले तणावाचे वातावरण, कश्मीमधला तणाव यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. यामुळे देखील तारखा निश्चित झाल्या नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांसाठी सोयीची वेळ ठरवून मगच दौरा आखला जाईल असे हिंदुस्थानातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा दौरा झाल्यास दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंधांना आणखी बळकटी मिळेल अशी आशा वर्तवली जात आहे. यामुळे हा दौरा हिंदुस्थानसाठी महत्वाचा ठरू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या