शोले, डीडीएलजेपासून ते तेंडुलकर आणि कोहलीपर्यंत.. ट्रम्प यांनी उधळली स्तुतिसुमने

1231

हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी 11वाजण्याच्या सुमाराला अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात डोनाल्ड यांनी उपस्थित जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी बॉलिवूड, क्रिकेट अशा विषयांवरही जनतेशी संवाद साधला.

या भाषणावेळी ट्रम्प म्हणाले की, बॉलिवूडचा आवाका प्रचंड मोठा आहे. इथे वर्षाकाठी जवळपास दोन हजार चित्रपटांची निर्मिती केली जाते. इथल्या चित्रपटांचं संगीत आणि भांगडा नृत्य बघण्यासारखं असतं. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे किंवा शोले यांसारखे क्लासिक चित्रपट इथे तयार होतात. हिंदुस्थानात क्रिकेटही अत्यंत लोकप्रिय असून हिंदुस्थानने जगाला सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडू दिले आहेत, अशा शब्दांत ट्रम्प यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. शोले, डीडीएलजे, तेंडुलकर, विराट ही नावं ट्रम्प यांच्या तोंडी ऐकल्याक्षणी उपस्थितांनी त्यांना उत्स्फुर्तपणे दाद दिली.

बॉलिवूडचं कौतुक करण्याची ही ट्रम्प यांची पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी समलैंगिक विवाहावर आधारित शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटाची प्रशंसा केली होती. पीटर गॅरी नावाच्या एका इंग्लंडस्थित कार्यकर्त्याने शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. त्याला प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी हा चित्रपट उत्तम असल्याचं म्हटलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या