हिंदुस्थानने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या लपवली; डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात राष्ट्रपतीपदासाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत चर्चेत (डिबेट) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान, चीन आणि रशियावर गंभीर आरोप केले आहे. त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जो बिडेन यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे आरोप केले आहेत. हिंदुस्थान, चीन आणि रशिया या देशांनी कोरोनाबाधितांची आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

जो बिडेन यांनी कोरोनाच्या महामारीबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारला होता, त्याला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, हिंदुस्थान, रशिया आणि चीनमध्ये कोरोनामुळे एकूण किती जणांचा बळी गेला याची योग्य आकडेवारी कोणालही माहित नाही. या देशांनी कोरोनाच्या मृतांची योग्य आकडेवारी जाहीर केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या चर्चेवेळी त्यांनी जो बिडेन यांच्यावरही हल्ला चढवला. आपण कोरोना संकट योग्य प्रकारे हाताळत आहोत. या संकटाच्या काळात जो बिडेन राष्ट्रध्यक्ष असते तर अमेरिकेत 20 लाख नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला असता, असा आरोप त्यांनी केला.

ट्रम्प यांच्या आरोपांना बिडेन यांनीही प्रत्युत्तर दिले. या संकटाविरोधात लढण्यासाठी ट्रम्प यांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यांनी फक्त वाट पाहिली. आजही या संकटाशी लढण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे कोणतीही उपाययोजना नसल्याचे त्यांनी सांगितले. उपाययोजना राबवण्यासाठी निधीची गरज असते. तो निधीही ट्रम्प प्रशासनाकडे नसल्याचा आरोप बिडेन यांनी केला. त्यामुळे कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात ट्रम्प प्रशासन अपयशी ठरल्याचे बिडेन म्हणाले. तसेच ट्रम्प हे आतापर्यंतच्या राष्ट्रध्यक्षांमध्ये सर्वात खराब कामगिरी करणारे राष्ट्राध्यक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या संकटाच्या काळात तातडीने आणि योग्य पावले उचलली नाहीत, तर कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढतील असा इशाराही बिडेन यांनी दिला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर आरोप केल्याने हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांची मते बिडेन यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांना आकर्षित करण्यासाठी बिडेन यांनी हिंदुस्थानशी मैत्री वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. तर ट्रम्प यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा व्हिडीओ निवडणूक प्रचारात जारी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या