…तरच व्हाईट हाऊस सोडणार; डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव मान्य करण्यास मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अजूनही तयार नाहीत. जो बायडन यांना इलेक्टोरल मतमोजणीत विजय मिळाला तरच आपण व्हाईट हाऊस सोडण्याबाबत विचार करू असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. सत्तेची सूत्रे बायजन यांच्याकडे सोपवण्याबाबत ट्रम्प यांनी अजूनही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आपला पराभव झालेला नाही, या मतावर ते ठाम आहेत.

सध्याच्या परिस्थितीत सत्तापरिवर्तनाबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या निकालात स्पष्टता नाही. त्यामुळे इलेक्टोरल मतमोजणीत बायडन यांचा विजय झाला तरच आपण व्हाइट हाऊस सोडण्याबाबत निर्णय घेऊ. तसेच बायडन यांचा इलेक्टोरल मतमोजणीत विजय झाल्यास ती मोठी चूक ठरेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. थँक्स गिव्हिंग संदेशात ट्रम्प यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

आपण दुसऱ्या कार्यकाळासाठी तयार असून गरज भासल्यास व्हाईट हाऊस सोडण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन यांचा विजय झाला आहे. मात्र, ट्रम्प आपला पराभव मान्य करण्यास तयार नाही. त्यामुळे 14 डिसेंबरला अमेरिकन सिनेटमध्ये होणारी इलेक्टोरल मतमोजणी महत्त्वाची ठरणार आहे.

निवडणुकीच्या मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप ट्रम्प यांच्याकडून करण्यात येत आहे. काही राज्यातील मतमोजणीविरोधात ते न्यायालयातही गेले आहेत. त्यामुळे आता इलेक्टोरल मतमोजणी महत्त्वाची ठरणार आहे. सध्या जो बायडन यांच्याकडे 306 तर ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल मते आहेत. ट्रम्प आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सत्तापरिवर्तन नेमके कधी होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या