कश्मीर प्रश्नी मी स्वतःहून मध्यस्थी करणार नाही; ट्रम्प यांचे स्पष्टीकरण

561

जम्मू -कश्मीर मुद्दा हा हिंदुस्थान आणि पाकिस्तान या उभय देशांतला प्रश्न आहे. त्यामुळे त्यात मी स्वतःहून मध्यस्थी करणार नाही. मात्र, उभय देशांना हा कळीचा मुद्दा सोडवण्यासाठी मदत करण्याची माझी तयारी आहे, असे स्पष्टीकरण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केले. 53 मिनिटे चाललेल्या या परिषदेत ट्रम्प यांनी सीएए कायद्याबाबत हिंदुस्थानी सरकार योग्य तो निर्णय घेईल असे सांगून त्याविषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.

सीएए कायद्याबाबत निर्णय इथल्या सरकारचा आहे. मला त्यात बोलण्याचा अधिकार नाही ,असे सांगून ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थानातील मुस्लिम नागरिकांसोबत प्रदीर्घ काळ सौहार्दाने काम करीत आहेत. याआधी देशात 4 कोटी संख्या असलेल्या मुस्लिमांची लोकसंख्या 20 कोटी झाली आहे, असे मोदी यांनीच मला सांगितले आहे. त्यामुळे मला यावर चर्चा करायची नाही.

हिंदुस्थान आमच्या मालावर मोठा कर लावतो
हिंदुस्थान आणि अमेरिकेतला व्यापार करार लांबण्याचे कारण म्हणजे हिंदुस्थान आमच्या निर्यात मालावर मोठा कर लावतोय. त्यामुळे अमेरिकन व्यापाऱ्यांना हिंदुस्थानशी व्यापार करताना जास्त मोबदला मोजावा लागतोय. हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल कंपनीला याचा मोठा फटका नुकताच बसलाय असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

सीमेपलिकडचा दहशतवाद थांबायलाच हवा
हिंदुस्थानी सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी पाकिस्ताननेही प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. हा हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात कळीचा मुद्दा आहे . दोन्ही देशांचे पंतप्रधान माझे चांगले मित्र आहेत. दहशतवाद संपविण्यासाठी या देशांना जी मदत लागेल ती पुरवायला अमेरिका नेहमीच तयार असेल, असेही आश्वासन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पाकिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या प्रश्नावर उत्तर देतांना दिले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेकडून 14 हजार कोटींचा खर्च
चीनमधून पसरलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने 14 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले, आता कोरोनाबाबत स्थिती तशी नियंत्रणात आहे. मी तालिबानशी अमेरिकेने केलेल्या शांती कराराबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी बोललो आहे. माझ्या स्पष्टीकरणाने हिंदुस्थानचेही समाधान होईल असे मला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या