हिंदुस्थानची हवा घाणेरडी! डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘नमस्ते ट्रम्प’ची परतफेड

लॉकडाऊनच्या आधी ‘नमस्ते ट्रम्प’चा शानदार पाहुणचार घेऊन गेलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील वातावरण बदलाचे खापर हिंदुस्थानवर फोडले.

हिंदुस्थानची हवा घाणेरडी आहे. चीन, रशियाप्रमाणेच हिंदुस्थानला प्रदूषणाबाबत काहीच पडलेले नाही. संपूर्ण जगातील हवा खराब करण्यास हेच देश जबाबदार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. अमेरिकेतील हवेचे गोडवे गाताना त्यांनी स्वतःच्या कृतघ्न वर्तणुकीचा धूर बाहेर सोडला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबरला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ट्रम्प व प्रतिस्पर्धी उमेदवार जो बिडेन यांच्यात अंतिम प्रेसिडेंशिअल डिबेट पार पडली. यावेळी बिडेन यांनी वातावरण बदलाच्या मुद्दय़ावरून ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला.

वातावरण बदलाचा संपूर्ण मानवजातीला धोका आहे. ट्रम्प यांना हा विषय चेष्टेचा वाटतो, असा आरोप त्यांनी केला. त्यावर अमेरिकेची हवा चांगलीच आहे. जरा हिंदुस्थान, चीन, रशियाकडे बघा, तिथली हवा किती घाणेरडी आहे, असे उत्तर ट्रम्प यांनी दिले. अमेरिकेतील कार्बन उत्सर्जन गेल्या 35 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आणल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर ओबामा केअर बिल, रिलीफ बिल, इमिग्रेशन आदी मुद्यावरून दोघांमध्ये चांगलीच ‘तू तू मैं मैं’ रंगली.

वर्षाअखेरपर्यंत कोरोना लस बाजारात – ट्रम्प

बिडेन यांनी कोरोना महामारीवरून ट्रम्प यांना पुन्हा घेरले. ट्रम्प यांच्या निष्काळजीपणामुळे लाखो लोकांचे प्राण गेले, अर्थव्यवस्थेचे वाट्टोळे लागले, ते राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्यास लायकच नाहीत, असा आरोप बिडेन यांनी केला. त्यांचे आरोप फेटाळताना ट्रम्प यांनी वर्षाअखेरपर्यंत कोरोना लस बाजारात येईल, असे आश्वासन दिले.

ट्रम्प आगीत तूप ओततात – बिडेन

ट्रम्प हे नक्षलवादाचे प्रतीक आहेत. ते नेहमीच आगीत तूप ओततात. याआधी अमेरिकेच्या इतिहासात इतका नक्षलवाद पसरवणारा एकही राष्ट्राध्यक्ष झालेला नाही, असा दावा बिडेन यांनी केला. त्यावर कृष्णवर्णियांसाठी अब्राहम लिंकन सोडल्यास माझ्याइतके काम दुसऱ्या कुठल्याच राष्ट्राध्यक्षाने केलेले नाही, असे ट्रम्प यांनी छातीठोकपणे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या