हिंसाचारात बळी जाणाऱ्या निष्पापांसाठी सैन्य उतरवेन, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

1766

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीयाच्या मृत्युचे तीव्र पडसाद उमटत आहेत. अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ सुरू आहे. या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य उतरवण्याचा इशारा दिला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी अमेरिकेतील राज्यांना नागरिकांना संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणतंही राज्य किंवा शहर त्याच्या नागरिकांच्या आणि त्यांच्या संपत्तीच्या संरक्षणाला नकार देत असेल, तर तिथे मी अमेरिकन सैन्य उतरवून त्यांचं काम सोपं करेन, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. जॉर्ज याच्या मृत्युमुळे सगळेच खूप दुःखात आहेत. पण, यामुळे उसळलेल्या हिंसाचारात अनेक निष्पाप जिवांचे बळी जात आहेत. राष्ट्राध्यक्षाच्या नात्याने मी त्यांच्या अधिकारांचं रक्षण करेन, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

या देशाचा कायदा माझ्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता असेल, अशी मी शपथ घेतली आहे आणि मी त्याप्रमाणेच वागणार आहे. रविवारी रात्री वॉशिंग्टन डीसी येथे जे झालं ते खूप चुकीचं होतं. मी हजारोंच्या संख्येने सशस्त्र सैन्य तिथे उतरवत आहे. त्यांचं काम दंगे, जाळपोळ, लुटालूट आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवणं हे असेल, अशी पुस्तीही ट्रम्प यांनी जोडली आहे.

अमेरिकेतील काही शहरांमध्ये हा हिंसाचार उफाळला आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या या हिंसाचाराची धग व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचली असून रविवारी व्हाईट हाऊसजवळ आंदोलन करणाऱ्यांनी तिथल्या कचरापेटीला आग लावली आणि पोलिसांसोबत धक्काबुक्कीही केली. परिस्थिती इतकी बिघडली की संरक्षणासाठी नेमलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संरक्षित बंकरमध्ये घेऊन गेले. सुदैवाने तिथे पोहोचलेल्या वॉशिंग्टन पोलिसांनी आंदोलकांना तिथून पिटाळून लावलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव्यांना दोषी ठरवलं असून या आंदोलनाची दिशा भरकटवल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेत पोलिसांकडून कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांवर होणारे अत्याचार नेहमीच तणावाचा विषय राहिले आहेत, आणि या घटनांविषयीची खदखद या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उफाळून आली आहे. या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तर डेरेक शॉविन या 44 वर्षीय श्वतेवर्णीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉविन यांना सोमवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

काय आहे हे प्रकरण
25 मे रोजी नकली नोटेचा वापर केल्या प्रकरणी कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. त्यात एक पोलीस कर्मचारी जवळपास सात मिनिटं जॉर्ज याच्या मानगुटीवर गुडघा ठेवून बसला होता, असं दिसत आहे. मला श्वास घ्यायला त्रास होत आहे, असं सांगूनही तो उठला नाही. श्वास गुदमरल्याने जॉर्ज बेशुद्ध पडला आणि नंतर मरण पावला. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत प्रक्षोभक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली.

आपली प्रतिक्रिया द्या