डोनाल्ड ट्रम्प यांच्या सात प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या ‘या’ व्यक्तीला मिळाली विशेष भेट!

829

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या हिंदुस्थान दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांनी सोमवारी पत्नी मेलानियासोबत ताजमहालाला भेट दिली. या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी एका व्यक्तीला विशेष भेट दिली आहे. या विशेष स्मृतीचिन्हावर ट्रम्प यांचे नाव असून व्हाईट हाऊसचा लोगोही आहे. या भेटीत ट्रम्प यांनी या व्यक्तीला सात प्रश्न विचारले. त्याने ट्रम्प यांच्या प्रश्नांना अचूक उत्तरे दिली. त्यामुळे समाधानी झालेल्या ट्रम्प यांनी त्या व्यक्तीला ही विशेष भेट दिली आहे. ट्रम्प यांना ताजमहालाबाबत माहिती देणाऱ्या गाइड नीतीन सिंह यांना ही भेट ट्रम्प यांनी दिली आहे.

ताजमहालाला भेट देताना ट्रम्प यांच्या मनात काही प्रश्न होते. ते त्यांनी नीतीन यांना विचारले. नीतीन यांनी ट्रम्प यांच्या प्रश्नांना विस्ताराने उत्तर दिले. नीतीनच्या या माहितीने ट्रम्प यांना समाधान वाटले आणि त्यांनी नीतीनला विशेष भेट दिली. ताजमहाल कोणी बनवला होता. या कामासाठी कारागीर कोठून आणले होते. मुगल बादशहा शहाजहानला कोठे कैदेत ठेवले होते. ताजमहालासाठी संगमरवर कोठून आणला होता. आतापर्यंत ताजमहालात काय काय बदल करण्यात आले. ताजमहालाच्या समोर असलेले तळे शहाजहान यांच्या काळात होते की नंतर बनवण्यात आले. तळघरातील कबरी आधी बनवण्यात आल्या की नंतर असे एकून सात प्रश्न ट्रम्प यांनी नीतीनला विचारले. नीतीनने शांतपणे आणि सविस्तरपणे ट्रम्प यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामुळे समाधान व्यक्त करत ट्रम्प यांनी नीतीनला ही विशेष भेट दिली.

ताजमहालाच्या भितींवर असलेल्या चित्रांबाबत ट्रम्प यांनी विचारणा केली असता, हे चित्र नसून या कलेला पच्चीकारी म्हणतात. संगमरवरावर अमूल्य रत्नांनी विशेष कलाकृती करून ते सजवण्यात येते, असे नीतीनने सांगितले. ताजमहातील मूळच्या कबरी आणि वर दिसणाऱ्या कबरी यांच्यामागे काय कहाणी आहे, असे ट्रम्प यांनी विचारले. इस्लाम धर्मात कबरी सजवण्यास मनाई आहे. त्यामुळे शहाजहान यांनी विशेष कलाकूसर केलेल्या कबरीच्या प्रतिकृती बनवल्याचे नीतीन यांनी सांगितले. ताजमहालासमोर असलेल्या तळ्यात साइफन पद्धतीने पाणी येते. हे तळे ताजमहालाच्या निर्मितीवेळीच बनवण्यात आल्याचे नीतीन यांनी सांगितले. ताजमहालाच्या निर्मितीसाठी जगभरातून कारागिर बोलवण्यात आले होते. ताजमहालासाठी मकरानामधून संगमरवर आणण्यात आले होते. तर दक्षिण हिंदुस्थानातील काळे दगड मागवण्यात आले होते, अशी माहिती नीतीन यांनी दिली. ताजमहालात आवाज घुमणारे घुमट, शाही मशीद आणि मेहमान खान्याबाबतही नीतीन यांनी ट्रम्प यांना माहिती दिली. नीतीन यांनी तारखेनुसार ताजमहालाच्या निर्मितीबाबतची माहिती ट्रम्प यांना दिली. तसेच शहाजहान आणि मुमुताज यांच्या प्रेमाची कहाणीही नीतीन यांनी ट्रम्प यांना सांगितली.

nitin

 

आपली प्रतिक्रिया द्या