…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही!

1434
motera-stadium

गुजरातच्या मोटेरा येथील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम ‘सरदार वल्लभभाई पटेल’वर 24 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘नमस्ते ट्रम्प’ असे या कार्यक्रमाचे नाव असून याच कार्यक्रमात ट्रम्प यांच्या हस्ते स्टेडिअमचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र गुजरात क्रिकेट असोसिएशन म्हणजेच जीसीएचे उपाध्यक्ष धनराज नथवानी यांनी शुक्रवारी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना 24 फेब्रुवारी रोजी स्टेडिअमचे उद्घाटन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

24 फेब्रुवारी रोजी केवळ ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली असून गुजरातसह देशभरातील वेगवेगळे कलाकार कार्यक्रम सादर करणार आहेत. यामध्ये कैलास खेर, पार्थिव गोहिल, पुरुषोत्तम उपाध्याय, किंजल दवे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती देखील धनराज नथवानी यांनी दिली.

1 लाख 10 हजार लोकांची क्षमता असलेल्या या स्टेडिअममध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी प्रचंड मोठी अशी एलईडी स्क्रीन उभी करण्यात येणार आहे. ज्यावर संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीचे हे क्षण सर्वांना दिसावे यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. मोदी अमेरिकेत हाउडी मोदी या कार्यक्रमासाठी गेले होते, त्यापेक्षा भव्य असा कार्यक्रम करण्यासाठी आयोजकांची धडपड सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या