डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलेल्या पत्रामुळे जो बायडन खूश…वाचा सविस्तर…

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका अनेक कारणांनी गाजल्या. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित नव्हते. तसेच त्यांनी प्रत्यक्ष भेटून बायडन यांना शुभेच्छाही दिल्या नाहीत. मात्र, व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी बायडन यांच्यासाठी मोकळ्या मनाने एक पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे बायडन ट्रम्प यांच्यावर खूश झाले आहेत. बायडन यांनीच या पत्राबाबतची माहिती दिली आहे.

ओव्हल ऑफीसमध्ये पहिल्याच दिवशी काही आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर बायडन पत्रकारांशी बोलत होते. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मोकळ्या मनाने आपल्यासाठी पत्र लिहिले आहे, असे बायडन यांनी सांगितले. मात्र, या पत्रात नेमके काय लिहिले आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. ट्रम्प यांनी हे पत्र आपल्यासाठीच लिहिले असल्याने त्यांच्याशी बोलल्याशिवाय पत्रातील माहिती देऊ शकत नसल्याचे बायडन यांनी स्पष्ट केले.

हे वैयक्तीक पत्र असल्याचे ट्रम्प यांच्या वरिष्ठ सहकाऱ्याने सांगितले. या पत्रात ट्रम्प यांनी नव्या प्रशासनाला आणि देशाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ओव्हल ऑफीसमध्ये कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसातील कामकाजात ट्रम्प यांनी बायडेन यांच्यासाठी पत्र लिहिणे, या कामाचाही यादीत समावेश केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेच्या परंपरेप्रमाणे मावळते राष्ट्रपती नवनिर्वाचित राष्ट्रपतींसाठी पत्र लिहून ठेवतात. मात्र, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडताना या चिठ्ठीबाबत कोणताही उल्लेख केला नाही.

ट्रम्प यांनी बायडन यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर आपल्या निकटच्या सहकाऱ्यांनाही दाखवला नाही, असे सूत्रांनी सांगितले. हे सकारात्मक पत्र असून ट्रम्प यांनी बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रात ट्रम्प यांनी अनेक चांगल्या बाबींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे बायडन ट्रम्प यांनी लिहिलेल्या पत्रावर खूश असल्याचे सूत्रांनी सांगितले. ट्रम्प यांनी पत्रातील मजकूर कोणालाच दाखवला नसल्याने त्याबाबतच्या चर्चा रंगत आहे.

ट्रम्प यांनी 2017 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासाठी बराक ओबामा यांनी लिहिलेल्या पत्रामुळे ट्रम्प भारावून गेले होते. त्यांनी ओबामा यांच्याशी बोलण्यासाठी फोन केला. मात्र, ते फ्लाइटमध्ये असल्याने त्यांना तो फोन घेता आला नव्हता. त्यानंतर या नेत्यांचे संभाषण झाले नाही. हे एक दीर्घ पत्र असून गहन आणि विचार करायला प्रवृत्त करणारे होते. हे पत्र लिहिण्यासाठी ओबामा यांनी बराच वेळ दिला होता. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा होती, असे ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर ओव्हल ऑफीसच्या व्हिजिटर्सलाही त्यांनी हे पत्र दाखवले होते.

आपल्या निरोपाच्या भाषणात ट्रम्प यांनी बायडन यांचे नाव न घेता नव्या प्रशासनाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपण नेहमीच लढाऊ वृत्ती दाखवू, असेही ट्रम्प म्हणाले. आपला हा निरोप जास्त काळासाठी नसेल, असेही ते म्हणाले. आपल्या आगामी वाटचालीसाठी आपण लवकरच माहिती देऊ, असे ते म्हणाले. ट्रम्प बायडन यांच्या शपथविधीलाही उपस्थित नव्हते. तरीही त्यांनी बायडन यांच्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठीची सर्वत्र चर्चा होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या