जुगार खेळणाऱ्या गाढवाची जामिनावर सुटका, पाकिस्तानी न्यायालयाने केला जामीन मंजूर

जुगार खेळण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानात एका गाढवाला अटक करण्यात आली होती. 4 दिवस या गाढवाला पोलिसांनी कोठडीत ठेवलं होतं. न्यायालयाने गाढवाला जामीन मंजूर केल्यानंतर गाढवाची मुक्तता करण्यात आली. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रहीम यार खान भागातील ही घटना असून या गाढवाला गेल्या शनिवारी अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी पोलिसांच्या या कारवाईमुळे सगळेजण त्यांच्यावर हसत होते.

जुगार खेळण्याच्या आरोपाखाली 8 जणांना अटक करण्यात आली होती. या सगळ्यांना एका दिवसांत जामीन मिळाला. मात्र गाढवाला 4 दिवस पोलीस कोठडीत काढावे लागले. जुगार खेळणाऱ्यांनी अटक केलेल्या गाढवावर सट्टा लावला होता. 40 सेकंदात हे गाढव 600 मीटर धावू शकते का ? यावर हा सट्टा लावण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या अड्डावर छापा मारला. खऱ्या गाढवासह सगळेजण पोलीस ठाण्यात पोहोचले. गाढवाला अटक केल्याचे कळताच माध्यम प्रतिनिधी गाढव कोण आहे हे शोधण्यासाठी या गावात पोहोचली होती. त्यांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या मुलाखती घेतल्या. गाढवाला अटक केल्याची बातमी जगभरात पोहोचली आणि पाकिस्तानी पोलिसांवर सगळेजण हसायला लागले.

पोलिसांनी या गाढवाला एका ठिकाणी बांधून ठेवलं होतं. गाढवाचा मालक गुलाम मुस्तफा याला गाढवाचा ताबा द्यावा असे निर्देश न्यायालयाने गाढवाला जामीन मंजूर करताना दिले. रहीम यार खान्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले की गाढवाचेही नावही एफआयआरमध्ये होते. या एफआयआरनुसार गाढवही जुगारात सामील होते, त्यामुळे त्यालाही आरोपी बनवण्यात आले.या गाढवाला पोलीस ठाण्याच्या बाहेर बांधण्यात आले. जुगार खेळणाऱ्या 8 जणांकडून 1 लाख 20 हजार रुपये हस्तगत करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या