
मुंबईतील खुल्या जागा, खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदानांचे सद्याचे धोरण बदलून या जागा देखभालीच्या नावाखाली खासगी संस्थांना किंवा व्यक्तींना दत्तक देऊ नका, अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे. केवळ मूठभर राजकीय लोकांसाठी महापालिकेने धोरणात बदल करू नये, असे आवाहन करत मुंबईकर या धोरणाविरोधात एकवटले आहेत.
मुंबईत 1200 एकरवर एकूण 1068 खुल्या जागा, खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने आहेत. या जागा पालिकेच्या ताब्यात आहेत. मुंबईतील खुल्या जागा, मैदानांबाबत नवे धोरण आखण्याचे आदेश सरकारने महापालिकेला दिले आहेत. मात्र, या जागांच्या देखभालीचे काम खासगी संस्था किंवा व्यक्ती यांना न देता या जागांची देखभाल महापालिकेने किंवा सरकारने स्वतः करावी, असा सूर माहीम येथील सेंट मायकल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सभेत उमटला. सभेचे आयोजन बॉम्बे पॅथोलिक सभेने केले होते.
सभेला माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी, आमदार अमित साटम, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, आरटीआय कार्यकर्ते भास्कर प्रभू, पी. श्रीगणेश आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे आयोजन डॉल्फी डिसोझा, नॉर्बर्ट मेंडोंवा, विनोद नोरोन्हा आणि त्यांच्या टीमने केले होते.