मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या जमिनींना सरसकट मुद्रांक शुल्क नको

27

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी संपादित करण्याचे काम सुरू असल्यामुळे आसपासच्या जमिनींना प्रचंड भाव आले आहेत. त्यातच राज्य सरकारने जमिनींचे मुद्रांक शुल्क अवाजवी वाढवल्यामुळे महामार्गापासून लांब असलेल्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार पूर्णतः ठप्प झाले आहेत. त्यामुळे केवळ महामार्गासाठी संपादित केलेल्या भूभागाचेच मुद्रांक शुल्क वाढवावे असा विनंती अर्ज विधान परिषदेतील काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी केला आहे. हा अर्ज सभापतींनी आज दाखल करून घेतला. यावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्याकरिता महामार्गाच्या लगतची शेतजमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. याकरिता शेतकऱयांना वाढीव मोबदला देण्यात येणार आहे. संपादित जमिनींसाठी राज्य सरकारतर्फे खरेदी- विक्री व्यवहारासाठी अवाजवी मुद्रांक शुल्क वाढवण्यात आले आहे. यामुळे येथील जमिनींचे भाव एकदम वाढले आहेत. पण याचा उलट परिणाम असा झाला आहे की जमिनींच्या खरेदी -विक्रीचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले आहेत. सरसकट मुद्रांक शुल्क वाढवण्यात येऊ नये याबाबतचा विनंती अर्ज हुस्नबानू खलिफे यांनी विनंती अर्ज समितीकडे दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या