बार व दारू गुत्त्यांना महापुरुष आणि देवदेवतांची नावे नकोत!

सामना प्रतिनिधी । मुंबई

बीअर बार आणि दारूच्या गुत्त्यांना जय अंबे, राणाप्रताप अशी देवदेवतांची व महापुरुषांची नावे यापुढे देता येणार नाहीत. महापुरुष आणि देवतांच्या नावाचा गैरवापर रोखणारा कायदा करून येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली.

दारूची दुकाने, मांसाहारी खानावळ आणि लोकनाट्य कला केंद्रांवरील महापुरुष, गडकिल्ले व देवतांच्या नावाचे फलक तातडीने हटवण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी मांडली. त्यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, गुमास्ता आणि कामगार कायद्याअंतर्गत हा विषय येत असल्यामुळे तातडीने यावर बंधन टाकता येणार नाही. मात्र याबाबत कामगार विभाग, उत्पादन शुल्क विभाग तसेच दोन्ही सदनांतल्या सदस्यांची बैठक घेण्यात येईल तसेच विधी आणि न्याय विभागाचे मत मागवून कायदा तयार करण्यात येईल.

कायदा करताना बीअर बारपुरता मर्यादित असावा अशी अपेक्षा शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. हा मुद्दा स्पष्ट करताना गोऱ्हे म्हणाल्या, देवाची नावे ही व्यक्तींनाही दिलेली असतात आणि दुकानांची नावे व्यक्तीच्या नावावरूनही दिली जातात. त्यामुळे कायदा करताना सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे. डॉक्टर, टीचर्स अशा विदेशी मद्याच्या नावाला बंदी घालण्याबाबतची मागणीही या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान करण्यात आली. यावर उत्तर देताना यासंदर्भात अभ्यास करावा लागेल असे बावनकुळे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या