जस्टिस लोया मृत्युप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊ नका! महाराष्ट्र सरकारची विनवणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जस्टिस लोया यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी करण्यात आली. या सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्युप्रकरणाची विशेष तपास पथकाकडून पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक याचिका महाराष्ट्रातील एक पत्रकार बंधुराज लोणे आणि कार्यकर्ते तहसीन पूनावाला यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली.

या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, कायदा आणि सुव्यवस्थेच्या आडून राजकीय हेतूंपायी एका विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमागचा छुपा हेतू हा विशिष्ट व्यक्तीविरोधात वातावरण तापवत ठेवण्याचा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पुन्हा चौकशीचे आदेश देऊ नयेत, अशी विनंती राज्य सरकारतर्फे मुकुल रोहतगी यांनी केली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरचा आपला निर्णय राखून ठेवत असल्याचं जाहीर केलं.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती लोया हे सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकी प्रकरणावर सुनावणी करत होते. या प्रकरणात अनेक पोलीस अधिकारी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचंही नाव समोर आलं होतं. प्रकरणाच्या सुनावणी काळातच १ डिसेंबर २०१४ रोजी न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू झाला होता.