चाचपडताय कशाला? अणुबॉम्बचे बटन शोधा!

26

अमेरिकेस लादेनचा ठावठिकाणा समजतो व ते पाकिस्तानात घुसून त्याचा खात्मा करतात. आम्हाला कुलभूषण जाधवांचे काय झाले ते समजत नाही. तिकडे सीरिया आणि अफगाणिस्तानात अमेरिका थेट कारवाई करीत आहे आणि इकडे कुलभूषण जाधवांसाठी मानवी साखळय़ांचे आयोजन केले जात आहे तर दिल्लीश्वर कुलभूषण जाधव कुठे आहेत ते शोधत आहेत. चाचपडताय कशाला? आधी अणुबॉम्ब फेकण्याचे बटन शोधा!

कुलभूषण जाधव यांचा ठावठिकाणा माहीत नाही, असे आता आमच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. जाधव हे पाकिस्तानातील कोणत्या तुरुंगात आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत याबाबत ‘महासत्ता’ हिंदुस्थान अंधारात चाचपडत आहे. हे चाचपडणे कधी संपेल ते आज कोणीच सांगू शकत नाही. जाधव हे हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी आहेत. हेरगिरीच्या आरोपावरून त्यांचे इराण येथून अपहरण केले गेले व पाकिस्तानात नेऊन त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. पाकच्या ‘अनाडी’ कोर्टाने म्हणजे लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली तेव्हापासून जाधव यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठे नवाज शरीफ यांचे पुतळे जाळले जात आहेत, कुठे शरीफ यांच्या फोटोस भररस्त्यात जोडे मारून स्वतःचे फोटो काढले जात आहेत, कुठे जाधव यांच्या समर्थनार्थ मानवी साखळय़ा तयार करण्याचे उपक्रम सुरू आहेत. सरकारी पातळीवरूनही इशारे वगैरे दिले जात आहेत, पण त्यामुळे कुलभूषण जाधव यांची फाशी टळणार आहे का? कसायांच्या वधस्तंभावरून जाधव यांना सुखरूप आणायचे असेल तर हिंदुस्थानलाच मनगटशाहीचा वापर करावा लागेल. जाधव यांचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जाहीर केले हे जरा

चिंताजनक

वाटते. अमेरिकेस लादेनचा ठावठिकाणा समजतो व ते पाकिस्तानात घुसून त्याचा खात्मा करतात. आम्हाला कुलभूषण जाधवांचे काय झाले ते समजत नाही. पाकिस्तानसारखा देश हिंदुस्थानची कुरापत काढण्याची एकही संधी सोडत नाही. कुलभूषण जाधव प्रकरण हे त्यातलेच. कुलभूषण जाधव यांचे प्राण वाचविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन पडेल ती किंमत मोजू असे दिल्लीश्वरांनी ठणकावल्यावरही कुलभूषण यांना फाशी देण्यावर पाकडे ठाम आहेत यास काय म्हणावे! पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱया शक्तींना नामोहरम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारणार नसल्याचे पाकिस्तानी लष्कराने जाहीर केले हा एक विनोदच म्हणावा लागेल. मुळात पाकिस्तानात हेरगिरी करण्यासारखे काय उरले आहे? तिथे विकास, संस्कार, संस्कृती, उद्योगाच्या नावाने बोंब आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, संरक्षण आदी विषयांत पाकिस्तानची सुईच्या टोकाइतकीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे तिथे हेरगिरी करण्यासारखे आहे तरी काय? दहशतवाद्यांचे तळ व धार्मिक अराजक हीच पाकडय़ांची जगभरासाठी ओळख आहे व त्यासाठी हेरगिरी करावी लागत नाही. पाकिस्तानचे लष्कर हे

दहशतवाद्यांचे पोशिंदे

बनले आहे. अशा पोशिंद्यांच्या बळावर राष्ट्र उभे राहत नाही व टिकत नाही. कश्मीरातील हिंसाचारामागे हेच पोशिंदे आहेत व त्यांचे अस्तित्व पूर्णपणे हिंदुस्थानद्वेषावरच टिकून आहे. पाकिस्तान हा माणुसकीचा कत्तलखाना बनला आहे व त्या कत्तलखान्यावर बॉम्ब टाकून बेचिराख केल्याशिवाय शांततेचा सूर्य उगवणार नाही. पाकव्याप्त कश्मीरात एकदा सर्जिकल स्ट्राइक नावाचा प्रकार करूनही त्यांचे डोके ठिकाणावर आले नाही. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फुटला असेच म्हणावे लागेल. सीरियाने ‘केमिकल वेपन्स’चा वापर करताच अमेरिकेने सीरियावर बॉम्बहल्ले केले. त्या बॉम्बहल्ल्यांनी रशियाचे पुतीन चीड चीड चिडले. गुरुवारी अफगाणिस्तानच्या दहशतवादी तळांवर अमेरिकेने ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ असे म्हटले जाणाऱया सर्वात मोठय़ा बिगर आण्विक बॉम्बचा वापर केला. या स्फोटात अनेक दहशतवादी ठार झाले. त्यात ‘इसिस’मध्ये सामील झालेल्या केरळमधील तरुणाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तिकडे सीरिया आणि अफगाणिस्तानात अमेरिका थेट कारवाई करीत आहे आणि इकडे कुलभूषण जाधवांसाठी मानवी साखळय़ांचे आयोजन केले जात आहे तर दिल्लीश्वर कुलभूषण जाधव कुठे आहेत ते शोधत आहेत. चाचपडताय कशाला? आधी अणुबॉम्ब फेकण्याचे बटन शोधा!

आपली प्रतिक्रिया द्या