गुंड घेऊन अंगावर याल तर हात उखडून टाकू-उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

सामना ऑनलाईन, मुंबई

‘मुंबई आणि मुंबईकरांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहणाऱया शिवसैनिकांना गुंड म्हणता! गुंड तर तुम्ही पक्षात भरताय. कलानी, उत्तम जानकर अशी किती यादी वाचायची. पण याद राखा, तुमच्या गुंडांनी आमच्या माताभगिनींवर हात टाकला तर हात उखडून टाकू’ असा जबरदस्त इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला दिला.

महानगरपालिका निवडणुकीत भगवे तुफान मुंबईभर उठले आहे. आज वडाळा आणि प्रभादेवी येथील दैनिक ‘सामना’ कार्यालयासमोर उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारसभा झाल्या. मुंबईकरांच्या मदतीसाठी धावलेल्या शिवसैनिकांना गुंड संबोधणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांनी या सभांमध्ये समाचार घेतला. ते म्हणाले की, 1992-93 च्या दंगलींमध्ये शिवसैनिकांनी मुंबई आणि मुंबईकरांच्या रक्षणासाठी अंगावर केसेस घेतल्या. वेळ पडली तर आजही अशा परिस्थितीत आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत. आमचे कार्यकर्ते गुंड नाहीत, सैनिक आहेत. जर याला तुम्ही गुंडगिरी म्हणणार असाल तर भाजपमध्ये कोण आले आहेत? उत्तम जानकर या लँडमाफियाला पक्षात घेताना ‘मुख्यमंत्री तुम क्यो चूप बैठे सबकुछ जानकर’ असा टोला लगावताना भाजपमध्ये एकही कट्टर कार्यकर्ता उरला नाही म्हणून तुम्हाला गुंडांची भरती करावी लागत आहे काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईला जिंकायचे तर मुंबईवर, मुंबईकरांवर प्रेम करा. तुमची गुंडागर्दी इथे चालणार नाही. कडेलोट होईल आणि होणारच असे ते म्हणाले.

भूमिगत झालेल्यांना भाजपात प्रवेश;

आता मेट्रो आरामात होणार

मुंबईत येणारी मेट्रो भूमिगत असावी असा सल्ला काहीजणांनी दिला,  पण भाजपमध्ये भूमिगत झालेले गुंडच प्रवेश करत असल्याने आता भूमी रिकामी झाली आहे. त्यामुळे या मोकळ्या जागेतून मेट्रो आपोआपच भूमिगत होईल, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.

आता तुमचे डोळेही फुकट तपासू

मुंबईकरांना आम्ही मोफत आरोग्यसेवा देण्याचे वचन दिले आहे. त्यामध्ये आम्ही मोफत नेत्रतपासणीही करणार आहोत. तुम्ही त्याचा लाभ घेऊन मुंबई नीट बघा…त्याच्यात पाटणा, पाटणा नाही तर भगवाच दिसेल. तुमची मात्र खोटेपणाची डाळ इथे शिजणार नाही…तुमच्या शोभाताईंना विचारा, त्यांच्यावरही डाळ घोटाळ्याचे आरोप झाले होते. इथे तर सगळंच काळं आहे, डाळच दिसत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

नमामि गंगाचे तीन हजार कोटी रुपये कुठे गेले?

गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी ‘नमामि गंगा’ हा प्रकल्प नरेंद्र मोदींनी राबवला. त्यावर तीन हजार कोटी रुपये खर्च केले, पण अजूनही गंगा शुद्ध झाली नाही याची आठवण करून देतानाच उद्धव ठाकरे यांनी हे तीन हजार कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले असा सवाल केला.

मुंबईनंबर वन,पाटणा अकराव्या स्थानावर, नागपूर कुठेय?

हा बघा पारदर्शकतेचा अहवाल. या अहवालात मुंबई पहिल्या नंबरवर आहे. बिहारचा पाटणा अकराव्या स्थानावर आहे. पण ज्या महानगरपालिकेत आपले मुख्यमंत्री महापौर होते त्यांची कुठली तरी चौकशीही झाली होती…ती माझी उपराजधानी…मला लाज वाटते…ती नागपूर महापालिका यात कुठे आहे, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील खड्डे आणि दुरवस्थेचे फोटो दाखवत ‘हे पाप तुमचे आहे’ असे मुख्यमंत्र्यांना ठणकावले.

खोटे बोलताना यांच्या तोंडाचे बोळके झाले

रस्त्यांची कामे, नालेसफाई घोटाळा झाल्याचे आरोप केले जात आहेत. पण यांचेच दात यांच्या लोकांनी घशात घातले आहेत. भाजप खासदार गोपाळ शेट्टीच म्हणाले, महापालिकेतील घोटाळ्यांना अभियंते आणि अधिकारीच जबाबदार आहेत.  आता खोटे बोलून दात घशात गेल्याने यांच्या तोंडाचे बोळके झाले आहे तरीही फिदी फिदी हसत आहेत. म्हणताहेत दात आहेत आमचे, पण पारदर्शक…म्हणून दिसत नाहीत. यांच्या सभाही पारदर्शकच. गर्दीच दिसत नाही, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मोदींच्या कुंडलीत शिवसेनाप्रमुख नसते तर किती शनी वक्री झाले असते

आपल्याकडे सर्वांच्या कुंडल्या असल्याच्या धमक्या नरेंद्र मोदी सर्वांना देत आहेत. पण जो जन्मला त्याची कुंडली असणारच. मोदींचीही कुंडली आहेच. शिवसेनाप्रमुख मागे उभे राहिले नसते तर मोदींच्या कुंडलीत किती शनी वक्री झाले असते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी दिला.

भाटगिरी करायची तर पक्ष कार्यालयात जा!

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाटगिरीवरही यावेळी हल्ला चढवला. जनतेने तुम्हाला पंतप्रधानांची खुर्ची दिली ती पक्षाची भाटगिरी करण्यासाठी नाही. भाटगिरी करायची असेल तर पक्ष कार्यालयात जा असे सुनावतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मोदींच्या पावलावर पाऊल ठेवले असल्याने त्यांनी भाटगिरी पक्ष कार्यालयातच दाखवावी असे ते म्हणाले.

खोटं बोलणारा मुख्यमंत्री लाभला हे दुर्दैव

खोटं बोलणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला हे आपलं दुर्दैव असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईतली नाल्यांची  लांबी ही गोव्यापर्यंत जाईल इतकी लांब आहे. याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी केला आहे का? येथील नालेसफाईची पाहणी त्या नाल्यांमध्ये उतरूनही मी केली आहे. रात्री अपरात्री येथील रस्त्यांची कामे जाऊन मी पाहिली आहेत. मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, कधी तरी रात्री-अपरात्री रस्त्याकरचे खड्डे कसे बुजवतात ते रस्त्यावर येऊन पाहिलंत का? कधी सफाई कर्मचारी घाणीत उतरून कसा काम करतो ते पाहिलंय का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उपनेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसले आणि मनीषा कायंदे यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या