‘आधार’ लिंकच्या मेसेजने लोकांना घाबरवू नका! सर्वोच्च न्यायालय

31

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

आधार कार्ड क्रमांक लिंक करण्यासाठी सातत्याने मेसेज पाठवून लोकांना घाबरवू नका, अशा स्पष्ट शब्दांत आज सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाईल सेवा देणाऱया कंपन्यांना फटकारले आहे. मेसेजमध्ये आधार लिंकची शेवटची तारीख कधी आहे याचा स्पष्ट उल्लेख करावा, असेही न्यायालयाने बजावले.

मोबाईल क्रमांकापासून बँक खात्यांपर्यंत आधार क्रमांक कार्ड लिंक करण्याची सक्ती सरकारने केली आहे. या सक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आधार कार्ड लिंक म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या खासगीपणाच्या हक्काचा (राईट टू प्रायव्हसी) निर्णयाचा भंग असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यावर आज सुनावणीवेळी मोबाईल नंबर आणि बँक खाते यांच्याशी आधार कार्ड लिंक करण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. मात्र, न्यायमूर्ती शिक्री यांच्या खंडपीठाने स्थगिती देण्यास नकार दिला. आधार लिंक सक्तीबाबतचा निर्णय घटनापिठापुढे आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी घटनापिठात सुनावणी होणार आहे असे न्यायमूर्ती शिक्री यांनी स्पष्ट केले. पण, आधार लिंक करण्याचे मेसेजेस सातत्याने पाठवून लोकांना घाबरवू नका. मेसेजेस पाठवताना आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे याचा ठळक उल्लेख करा असे खंडपीठाने मोबाईल कंपन्या आणि बँकांना फटकारले.

मोबाईल-आधार जोडणीची डेटलाईन ६ फेब्रुवारी
मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत आहे असे केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. बँक खात्यांशी आधार लिंकची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली आहे. परंतु नवीन बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्डची सक्ती केली आहे.

न्यायमूर्तींनाही मेसेज येताहेत
आधार कार्ड लिंक केले नाही तर मोबाईल नंबर बंद होईल, बँक खाते बंद करू, अशा सततच्या मेसेजेसमुळे लोक वैतागले आहेत. पण आज सुनावणीवेळी न्यायमूर्ती शिक्री यांनी न्यायमूर्तींनाही असे मेसेज येत आहेत याकडे लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या