रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही? ‘हे’ पदार्थ खा

रात्रीच्या वेळी शांत झोप ही सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते, पण काही जणांना झोप लागण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. चांगली झोप लागणे हे बऱ्याच वेळा मानसिक आरोग्यावर अवलंबून असले, तरी काही वेळा आपण दिवसभरात कोणता आहार घेतो ? याचाही झोपेवर परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी कर्बोदके, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमयुक्त आहार घेतला तर त्याचा झोप लागण्यावर चांगला परिणाम होतो. कमीत कमी 6 ते 8 तास झोपणे गरजेचे आहे. यामुळे शरीर दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने राहते. याकरिता गाढ झोपेकरिता आहारातील काही पदार्थ गुणकारी ठरतात.

बदाम

बदामात मेलाटोनिन या घटकाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. यामुळे झोप आणि जागे राहणे या दिवसभरातील दिनक्रमावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. झोपेसाठी आवश्यक असलेले मॅग्नेशियम द्रव्य बदामांमध्ये जास्त प्रमाणात असते. शरीरातील मॅग्नेशियम कमी होते तेव्हा व्यक्तिची झोप उडते. ज्या लोकांना मध्यरात्रीपर्यंत झोप लागत नाही अशांना बदाम उपयुक्त ठरते. बदामामुळे डोकेदुखीसुद्धा कमी होते.

दूध

रात्री झोपण्याच्या आधी गरम दूध प्यावे. गरम दुधात हळद मिसळूनही पिऊ शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि पचनक्रिया सुधारण्याकरिता हळद घातलेले गरम दूध पिणे फायदेशीर ठरते. झोप येण्याकरिता आवश्यक असलेल्या घटकांचा दुधात समावेश असतो. अक्रोडमध्ये मेलाटोनिन, सेरोटिनन आणि मॅग्नेशियम असते. यामुळे झोप न लागण्याचा त्रास दूर होतो.

केळ

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. केळ्यातील मॅग्नेशियममुळे शांत झोप लागायला मदत होते. म्हणून झोपण्यापूर्वी केळी खावी. याचा उपयोग झोप आणि पचनालाही होतो. रक्ताभिसरणही चांगले होते. केळ्यातील ट्रिप्टोफॅन नावाचे द्रव्य मेंदुला संचालित करते. कारण त्यातून मेलॅटोनीन आणि सेरोटिनीन ही दोन द्रव्ये निर्माण होतात. जी झोपेतल्या विविध अवस्थांचे संतुलन राखण्यास मदत करतात.

मध

झोपण्यापूर्वी एक चमचा मध घेतले तरी चालते. ट्रिप्टोफॅन हे द्रव्य मधामध्ये असते. म्हणून ज्यांना झोप लागत नाही त्यांनी चमचाभर मध घ्यावे.

द्विदल धान्य

यासोबत विविध प्रकारची द्विदल धान्ये हीसुद्धा ट्रिप्टोफॅनयुक्त असतात. म्हणून रात्रीच्या जेवणातसुद्धा अशा धान्याचा समावेश करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या