बांगलादेशला लिंबूटिंबू समजू नका!

>> द्वारकानाथ संझगिरी  

या विश्वचषकात आता ‘न भूतो’ अशा काही गोष्टी होतायत. आधी पावसाने धुमाकूळ घातला, आता फलंदाज धावांचा पाऊस पाडतायत. सर्वसाधारण परिस्थितीत सवादोनशे धावा ही आता दारिद्रय़रेषेखालची परिस्थिती झालीय. पावणेतीनशे धावा हा डाळभात झालाय. तीनशेच्या पुढे उच्च मध्यमवर्ग सुरू होतो. परवा इंग्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध श्रीमंतीची व्याख्या ठरवली. कुणी सांगावं, येत्या शनिवारी अफगाणिस्तानबरोबर खेळताना रोहित-विराट ‘श्रीमंती’ची व्याख्या आणखी वर नेऊन ठेवतील.

गेले दोन-तीन सामने धक्कादायकच होते. इंग्लंडच्या जवळपास 400 धावा मी समजू शकतो. इंग्लंडचे वरचे फलंदाज तुफान फॉर्मात आहेत. शेवटपर्यंत त्यांना घाव घालणार्‍या फलंदाजांची ददात नाही. त्यात अफगाणिस्तानचा संघ या स्पर्धेत पराभूत मनःस्थितीतच आहे. त्यामुळे एवढा चांगला धावांचा पाया मिळाल्यावर मॉर्गनसारख्या आक्रमक आणि इंप्रोव्हायझेशन करणार्‍या फलंदाजाने तोफाच डागल्या. अफगाणिस्तानची गोलंदाजी एखाद्या जीर्ण किल्ल्याच्या बुरुजासारखी कोसळली, पण बांगलादेशचा विजय आश्चर्यकारक होता. वेस्ट इंडीजच्या 321 धावांचा पाठलाग पुरा करण्यासाठी त्यांना बेचाळिसावं शतकही पूर्ण लागलं नाही. शकीब अल हसन त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक खेळी खेळून गेला. किंबहुना त्याने बांगलादेश क्रिकेटचा नवा इतिहास लिहायला घेतलाय. त्याबद्दल मला या स्तंभात बोलायचंय, पण तत्पूर्वी धावांच्या या भरभराटीबद्दल बोललं पाहिजे. इंग्लंडच्या खेळपट्टय़ा आता फलंदाजधार्जिण्या झाल्या आहेत की बनवल्या आहेत हे इंग्लंड – पाकिस्तान वन-डे मालिकेतच दिसलं. पाकिस्तानी संघ सवातीनशे – साडेतीनशे धावा करीत होता आणि इंग्लंडचा संघ त्याचा लीलया पाठलाग करीत होता. जेव्हा एक स्कोअरबोर्ड हरणाच्या पायाने पळायचा तेव्हा दुसरा चित्ता व्हायचा. काही पंडितांचं म्हणणं होतं की, सामना दुपारी सुरू होणं आणि सकाळी साडेदहाला होणं यात फरक आहे. सकाळी इंग्लंडमध्ये जास्त स्विंग मिळू शकतो. थिअरी म्हणून हे बरोबरच होतं. सुरुवातीला काही खेळपट्टय़ा किंचित हिरवटही होत्या. तसंच दोन देशांमधल्या स्पर्धेत प्रत्येक वेळी तीनशेच्या वर धावा होणं वेगळं आणि वर्ल्डकपमध्ये होणं वेगळं असंही मत मांडलं गेलं. कारण वर्ल्डकप हा सर्वोच्च रंगमंच असतो, पण आता सर्व थिअरीजनी व्यवहारापुढे माना टाकल्या आहेत. याआधी वाटलं होतं, तीनशे धावा होणं ठीक आहे, पण तीनशेचा पाठलाग कठीण आहे. ते खरंही होतं. पाकिस्तानने इंग्लंडपुढे तीनशे अधिक धावांचं आव्हान ठेवलं, पण या विश्वचषकातील सर्वात प्रक्षोभक मानली जाणारी इंग्लिश फलंदाजी सुमार पाकिस्तानी गोलंदाजीसमोर पाठलाग करू शकली नाही. ऑस्ट्रेलियासमोर ओव्हलवर आपण ठेवलेले आव्हान ऑस्ट्रेलियाला झेपलं नाही. वॉर्नर असा खेळला की, त्याचं आडनाव ‘पुजारा’ आहे. बांगलादेशच्या तीनशेच्या आव्हानापुढे दक्षिण आफ्रिकेने जोहार मायबाप केलं, पण त्याचं बांगलादेशने परवा वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत किल्ला सहज सर केला आणि विश्वचषकाच्या रंगमंचावरही असा पाठलाग अशक्य नाही हे दाखवलं.

तीनशे धावा का होतात याची कारणं सांगून सांगून आता गुळगुळीत झाली आहेत.

बदललेल्या बॅटपासून टी-20 ने मोठे फटके मारण्याची तयार झालेल्या वृत्तीपर्यंत त्यात अनेक गोष्टी येतात. फलंदाजीतलं इंप्रोव्हायझेशन तर इतकं झालंय की, कोचिंग मॅन्युअल्स बदलायची वेळ आलीय. केशवसुतांनी एकेकाळी ‘बदलाची तुतारी’ मराठी साहित्यात फुंकली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं-

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरून टाका

सडत न एवढ्या ठायी ठाका

सावध ऐका पुढल्या हाका

खांद्यास चला खांदा भिडवुनी

जयसूर्या, सचिन, ए. बी. डिव्हिलियर्स, दिलशान, मॉर्गन, धोनीसारख्यांनी या पुढल्या हाका ऐकल्या आणि खांद्याला खांदा भिडवून नवे फटके तयार केले. लेंग्थ बॉलना खलनायक ठरवलं. त्याने फलंदाजीचं रूप अधिक जोखमी, पण आकर्षक आणि आक्रमक केलं. अर्थात पुस्तकी फटक्यांनीही उत्तम स्ट्राईक रेट राखत धावा करता येतात हे सचिन, अरविंद डिसिल्व्हा, लारा, विराटने दाखवलं. आता या स्पर्धेत रोहित शर्मा आणि जो रूट दाखवतोय, एक शैलीदार फलंदाजीचा राजपुत्र वाटतो, दुसरा शास्त्रशुद्धतेचा. या बदलामुळे धावांचा ओघ वाढला. त्यात दोन नवीन चेंडू हा नियम गोलंदाजांना मदत करण्याऐवजी फलंदाजधार्जिणा ठरला. मुळात पांढरा चेंडू हा लाल चेंडूएवढा हवेत भिरभिरत नाही. त्यात प्रत्येक चेंडूवर फक्त 25 षटकं टाकायची असल्यामुळे चेंडू शेवटपर्यंत तरुणच राहतो. त्यामुळे रिव्हर्स स्विंगची पेन्शन आता गोलंदाजांना मिळत नाही. मुख्य म्हणजे शेवटपर्यंत चेंडू जास्त कडक राहतो. पूर्वी हाणामारीच्या षटकांत चेंडू मृदू झाल्यामुळे जोर काढून मारावा लागायचा. आता बिलियर्डस्च्या चेंडूसारखा चेंडू पन्नासाव्या षटकातही जातो. आयटीच्या युगात जसे उच्च मध्यमवर्गीय वाढले तसेच वन-डे क्रिकेटमध्ये झाले. फलंदाजांच्या वाढत्या कमाईमुळे तीनशे धावा ही उच्च मध्यमवर्गाची मिळकत झाली.

अरे हो, आणखी एक बदल महत्त्वाचा आहे. पूर्वी धावांची गती वाढवण्याचे दोन टप्पे मानले जायचे. एक पहिली पंधरा षटकं (त्यावेळी वर्तुळाबाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक हा नियम पंधराव्या षटकापर्यंत होता आणि शेवटची दहा षटकं. त्यांना सवयीने आपण हाणामारीची षटकं, ‘स्लॉग ओव्हर्स’ असं म्हणतो. मधल्या षटकांत विकेट हातात ठेवणं आणि शेवटच्या दहा षटकांत जोखीम घेणे वगैरे डावपेच होते. आता तसं नाही. मधल्या तीस षटकांत फक्त चार क्षेत्ररक्षक वर्तुळाबाहेर असल्यामुळे (पूर्वी पाच असत) तिथेही धावांचं पीक जोरात निघतं. त्यात रनिंग बिटवीन द विकेटचा दर्जा खूपच वाढलाय. पूर्वी आम्हाला जावेद मियांदाद, आसिफ इक्बाल, डीन जोन्सच्या आक्रमक रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक वाटायचं. आता प्रत्येक संघात तसं रनिंग बिटवीन द विकेट असणार आहे. विराट-धोनीमध्ये असं  अंडरस्टँडिंग असतं की, त्याचा विराट आणि धोनीच्या बायकोलाही हेवा वाटेल. रन धावताना सदतीस वर्षांचा धोनी सतरा वर्षांचा वाटतो. विराट शतक ठोकल्यावरही एकेरी धाव काढतो. त्याला प्रत्येक एकेरी धावेवर एक मर्सिडीज मिळणार आहे असा धावतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे समोरच्या संघाने तीनशे धावा उभारल्या आहेत याचं फार मोठं भय राहिलेलं नाही. अगदी परवाचंच उदाहरण घ्या. बांगलादेशचा शकीब म्हणाला, ‘‘वेस्ट इंडीजच्या 321 धावांनंतर लंचला ड्रेसिंग रूममध्ये दबाव नव्हता. त्याचा पाठलाग कठीण आहे असं आम्हाला कुणालाच वाटले नाही. प्रत्येक जण मस्त थंड होता.’’ जिंकल्यामुळे त्याने मारलेल्या या गमजा नव्हत्या. हा आत्मविश्वास आहे. हा त्यांना अलीकडे मिळालेला आत्मविश्वास आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरोधात ज्या 350 धावा केल्या त्या त्यांच्या वन-डेतल्या सर्वाधिक धावा होत्या. त्यानंतर आता हा 321 धावांचा पाठलाग. म्हणजे त्यांच्या प्रगतीचा झपाटा आपल्याला कळेल. ते त्यांना जमले. त्यात एक भाग मी वर उल्लेखलेल्या मधल्या 30 षटकांच्या कामगिरीचाही आहे. त्याचं महत्त्व त्यांच्यावर त्यांचा दक्षिण आफ्रिकन प्रशिक्षक नील मॅकेन्झीने बिंबवलंय. त्यांची त्या मधल्या षटकांतली धावांची सरासरी 41.20 आहे. ती आक्रमक वेस्ट इंडीज फलंदाजांपेक्षा 11.4 धावांनी जास्त आहे. त्या षटकांमधली त्यांची डॉट बॉलची (ज्या चेंडूवर धाव निघाली नाही तसे चेंडू) सरासरीही कमी आहे. म्हणून बांगलादेश बड्या संघाच्या जवळ पोहोचला आहे.

सिगारेटच्या पाकिटावर ‘सिगारेट ओढणं प्रकृतीला हानीकारक आहे’ असं लिहिलेलं असतं. बड्या संघांनीही आपल्या ड्रेसिंग रूमवर धोक्याची सूचना लिहून ठेवावी- ‘बांगलादेशला कमी लेखणं हानीकारक आहे.’

dsanzgiri@hotmail.com