वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलिसांना दुप्पट दंड भरावा लागणार

फोटो सौजन्य-इंडीयन एक्सप्रेस

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

हेल्मेट सक्ती असतानाही हेल्मेट न घालता बाईक चालवली तर गुजरातमध्ये पोलिसांना दुप्पट दंड भरावा लागणार आहे. गुजरातच्या पोलीस आयुक्तांनी या संदर्भातील एक परिपत्रक जारी केलंय ज्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

सामान्य नागरिकांना हेल्मेट न घातला बाईक चालवल्यास १०० रूपये दंड भरावा लागतो मात्र पोलिसांनी हा नियम मोडल्यास त्यांना २०० रूपये दंड भरावा लागेल. दंडापुरता ही बाब मर्यादीत राहणार नाहीये, नियम मोडणाऱ्या पोलिसाचा एक मेमो तयार करण्यात येईल आणि तो पोलीस उपायुक्ताकडे पाठवण्यात येईल. तिथे उपायुक्त नियम मोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ३००० रूपयांपर्यंत विभागीय दंड लावू शकतो.

पोलीस आयुक्तांनी याबाबत बोलताना सांगितलंय की नियम मोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध निलंबनाचीही कारवाई केली जाऊ शकते. आत्तापर्यंत २०० पोलीस कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने शिक्षा देण्यात आल्याचं एका हिंदी वृत्तपत्राने छापले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या