मुंबईच्या कॉलेजमध्ये ‘पुणेरी’ वातावरण आणू नका! जेजेच्या अधिष्ठात्यांची 8 महिन्यात बदली

867

जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची अवघ्या आठ महिन्यात बदली करण्यात आली आहे. या बदलीमागची कारणं निव्वळ प्रशासकीय नसून विद्यार्थ्यांवर लादलेले निर्बंधही असल्याचं वृत्त आहे. चंदनवाले यांची बदली पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, चंदनवाले यांची अधिष्ठाता पदावर नियुक्ती झाल्यापासूनच या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली होती. चंदनवाले यांच्या नियुक्तीनंतर रुग्णालयाच्या कार्डिओ थोरासिस विभाग बंद झाला होता. शस्त्रक्रियांसाठीची उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी उपकरणे पाठवणं बंद केलं होतं. त्यानंतर थोड्याच दिवसात एन्डोस्कोपी, लेप्रोस्कोपी आणि कोलोनोस्कोपीची उपकरणे जुनी झाल्यामुळे या संबंधित कोणतीही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी नकार दिला होता. जुलै महिन्यात डोंगरी येथील इमारत दुर्घटनेनंतर जखमींना जागा मिळावील म्हणून इतर रुग्णांना रुग्णालयाच्या आवारातील फरशीवर झोपवण्यात आले होते. चंदनवाले यांच्या कारकिर्दीतच या तीन घटनांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची भर पडली. कॉलेजच्या समारंभावेळी मुला-मुलींना वेगवेगळे बसवणे, कॉलेजचे तास संपल्यानंतर मुला-मुलींनी एकत्र वेळ व्यतित न करण्याबाबत बजावणे, महाविद्यालयात ड्रेसकोड लागू करणे असे प्रकार डॉ. चंदनवाले यांनी केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. या तक्रारीवर चौकशीचे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाकडून त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले. संचलनालयाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचं सांगत, मुंबईतील कॉलेजमध्ये ‘पुणेरी’ वातावरण तयार करू नका, अशा शब्दात चंदनवाले यांची कानउघाडणीही केली. संचलनालयाच्या अधिकृत सूत्रांनुसार, चंदनवाले यांच्याविरोधात सहा तक्रारी दाखल झाल्या होत्या. यात विद्यार्थी, पॅरामेडिकल कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि काही डॉक्टरांचाही समावेश आहे. चंदनवाले यांच्या छळवादी वागणुकीला कंटाळल्याचा सूर या तक्रारीत दिसत असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या