डॉ. अक्षयकुमार काळे

202
फोटो सौजन्य: यू ट्यूब

>>प्रशांत गौतम

डोंबिवली येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये भरणार्‍या ९०व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांची अपेक्षेनुसार निवड झाली. ६९२ एवढे मताधिक्य घेऊन त्यांनी एकहाती विजय संपादन केला. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात डॉ. काळे हे बारावे वैदर्भीय लेखक आहेत ज्यांना हा अध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या विजयाने आणखी एक पुनरावृत्ती झाली आहे ती म्हणजे नागपुरात साहित्य महामंडळाचे कार्यालय असताना नऊ वर्षांपूर्वी डॉ. अरुण साधूंना बहुमान प्राप्त झाला होता. या वेळेसचा सन्मान डॉ. काळे यांना प्राप्त झाला आहे. या निकालाच्या निमित्ताने मराठी साहित्य रसिक असणार्‍या मतदारांनी डॉ. काळे यांच्या काव्यनिष्ठेचाही यथोचित गौरव केला आहे, असे म्हणावे लागेल.

कविता हाच त्यांचा ध्यास होता. एवढेच नाही तर कवितेचा विचार ही त्यांची जीवननिष्ठा होती. काव्यलेखन प्रारंभाच्या निमित्ताने त्यांनी साहित्य क्षेत्रात वाटचाल सुरू केली आणि वाटचाल सुरू करीत असताना ललित लेखन, लघुकथा हे वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले, मात्र त्यांच्यातील समीक्षकाने या सर्व बाबींना बाजूला टाकले तेव्हापासून त्यांची तीच ओळख निर्माण झाली आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. आई-वडिलांना वाचनाची आवड असल्याने डॉ. काळे यांना घरातच वाङ्मयीन वातावरण लाभले आणि अशा पोषक वातावरणातून त्यांचा प्रवास सुरू झाला जो पुढील वाटचालीत बहुआयामी होत गेला. साक्षेपी संपादक आणि व्यासंगी समीक्षक या महत्त्वाच्या भूमिका त्यांनी वेळोवेळी पार पाडल्या. अमरावती जिल्ह्यात वरुड येथे २७ जुलै १९५३ साली जन्मलेल्या काळे यांनी १९७४ च्या सुमारास एम. ए. पूर्ण केले. १९८० ते १९९६ या कालावधीत नागपूरच्या धरमपेठ भागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात अधिव्याख्याता, त्यानंतर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागात १९९६ साली प्रारंभ प्रपाठक, २००२ मध्ये विभागप्रमुख, २००४ साली प्रोफेसर असा त्यांचा शैक्षणिक क्षेत्राचा प्रवास झाला. पीएचडीच्या संशोधनासाठी संशोधन आयोगाची त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत त्यांनी स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह असा विषय घेतला. त्यात त्यांनी पंचविसाव्या वर्षीच पीएच.डी. मिळवली. मनात आणले असते तर त्या पीएच.डी. ग्रंथाचे ते पुस्तक करू शकले असते, पण यासंदर्भात त्यांना पुढील अभ्यास करणे महत्त्वाचे वाटले.

अभ्यास आणि सखोल चिंतनातून डॉ. काळे यांनी आधुनिक मराठी कवितेचा व्यापकपट अभ्यासाला घेतला आणि ‘अर्वाचिन मराठी काव्यदर्शन’ हा ग्रंथ सादर करून त्यात डी.लीट. संपादन केली. अशा प्रकारचा अभ्यास यापूर्वी डॉ. माधव पटवर्धन (कवी माधव ज्युलियन), डॉ. रा. चि. ढेरे, डॉ. ए. ना. गोखले यांनी केला होता. त्या यादीत काळे यांना स्थान मिळाले. डॉ. काळे हे गालिबचे चाहते आहेत. त्या जाणिवेतून गालिब चरित्र आणि काव्यलोचन हा ग्रंथ निर्माण झाला. त्याशिवाय सूक्त संदर्भ (१९८५), गोविंदाग्रज समीक्षा संपादन (१९८७), अर्वाचिन मराठी काव्यदर्शन (१९९९), मर्ढेकरांची कविता : आकलन आस्वाद आणि चिकित्सा (२००६), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्ती आणि वाङ्मय संपादन (२००८), सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांतता (संपादन), गालिबचे उर्दू काव्य विश्‍व : अर्थ आणि भाष्य असे दर्जेदार आणि सकस ग्रंथ ही त्यांच्या साक्षेपी संपादन आणि समीक्षेची साक्ष देतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने त्यांच्याच साक्षेपी संपादनात ‘शतदीक्षांत’ ही स्मरणिका आकारास आली. लेखन-वाचन, अभ्यासासोबतच विविध चर्चासत्रात शोधनिबंधांचे वाचन विविध विद्यापीठांच्या मराठी विभागातील व्याख्याने, विविध संमेलने आणि परिषदांचे अध्यक्षपद अशी डॉ. काळे यांची भरगच्च वाटचाल अधोरेखित करणारी आहे. साहित्य अकादमीचे सदस्य राहिलेल्या डॉ. काळे यांना लेखनासाठी आणि शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी राज्य पुरस्कार लाभले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सेतू माधवराव पगडी याही पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. पुण्याची मसाप, नागपूरचा विदर्भ साहित्य संघ, संभाजीनगरची मराठवाडा साहित्य परिषद यांच्याही महत्त्वाच्या सन्मानाचे ते मानकरी ठरले. या विविधांगी प्रवासाच्या टप्प्यावर डॉ. अक्षयकुमार काळे यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचाही सन्मान प्राप्त झाला. ही विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब समजली पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या