संस्कृत शिकता आलं नाही म्हणून बाबासाहेबांनाही होता खेद: सरसंघचालक मोहन भागवत

8

सामना प्रतिनिधी ।  नागपूर

संस्कृत समजून घेतल्याशिवाय हिंदुस्थानला समजून घेणे कठीण असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले. देशाची परंपरा जाणून घेण्यासाठी संस्कृत जाणणे महत्त्वाचे आहे. आपल्याला संस्कृत शिकायला मिळाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खेद व्यक्त केला होता, असे वक्तव्य भागवत यांनी केले.

नागपूर येथे एका पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. ते म्हणाले, देशात सध्या अस्तित्वात असलेल्या भाषा ज्यामध्ये आदिवासी भाषांचाही समावेश आहे त्यामध्ये किमान 30 टक्के संस्कृत शब्दांचा समावेश होतो. म्हणूनच संस्कृत भाषा येत नसेल तर देश समजून घेता येणार नाही, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. मला माझ्या देशाबद्दल, देशातील माणसांबद्दल आणि परंपरांबद्दल  माहिती घ्यायची आहे.  जर ती माहिती पाश्चिमात्य भाषांमध्ये असेल तर ती  सत्य असेलच असे नाही, असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. त्यामुळे  प्रत्येकाला संस्कृत भाषा शिकता आले पाहिजे, अशा रीतीने शिकवली पाहिजे, असे भागवत म्हणाले.

संस्कृत ज्ञानाची भाषा

संस्कृत ज्ञानाची भाषा आहे आणि खगोल विज्ञान, कृषी, आयुर्वेदमधील सर्व ज्ञान संस्कृतमध्ये मिळवता येते. देशाच्या आधुनिक पूर्व इतिहासाचे स्रोतही संस्कृतमध्येच आहेत, असे मोहन भागवत म्हणाले. आपल्या देशातील कोणत्याही भागातील कोणतीही भाषा अशी नाही जी तीन ते चार महिन्यांत शिकता येत नाही. जर आपण पहिल्यांदाच एखादी भाषा ऐकत असू आणि ती व्यक्ती हळू बोलत असेल तर किमान आपण त्याची भावना समजू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.