मराठेकालीन स्त्रीजीवन – सखी राज्ञी जयती

  • डॉ. अनुराधा कुलकर्णी

छत्रपती संभाजीराजांच्या मोहिमांमध्ये अवघड प्रसंगात येसूबाई त्यांच्याबरोबर असत. शंभूराजांच्या सहवासात असताना राजांना सर्व प्रकारचे सहकार्य येसूबाईंनी केले होते, हे संभाजीराजांचे चरित्र वाचले की समजते. वेरूळच्या लेण्यातील शंभूमहादेवाच्या मांडीवर बसलेली पार्वती पाहून मराठय़ांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या माझ्यासारख्या स्त्र्ााrमनाला शंभूराजांच्या येसूबाई साहेबांचा सखी राज्ञी जयतीहा शिक्का आठवतो.

स्त्र्ााr जीवनातील एक महत्त्वाचे नाते म्हणजे सून! लेकीपेक्षा सुनेचाच अधिकार घरावर जास्त असतो. छत्रपती शिवरायांच्या दोन्ही सुना, महाराणी येसूबाई व महाराणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाने मराठय़ांचा इतिहास उजळून टाकला आहे. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर या दोन महाराण्यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत तळपत ठेवली. राजाराम महाराजांची पत्नी ताराराणी हातात तलवार घेऊन रणरागिणीच्या रूपाने औरंगजेबाला पुरून उरली. मात्र संभाजीराजांच्या बरोबर महाराणीपदावरील येसूबाईंना, शंभूराजांच्या मृत्यूनंतर तेवीस वर्षे औरंगजेबाच्या कैदेत काढावी लागली.

येसूबाईसाहेबांची आज फक्त दोनच पत्रे उपलब्ध आहेत. या दोन पत्रांमधून या महाराणीचे व्यक्तिमत्त्व, राजकारभारावरील वर्चस्व, राष्ट्रप्रेम, पतीप्रेम आणि अगतिकताही समोर येते.

राणी येसूबाईंच्या 1682 सालच्या एक अभयपत्रावर या राणीचा शिक्का व मोर्तब आहे. चाफळच्या श्रीराम मंदिराला लष्करी मेहिमांच्या धामधुमीचा त्रास होणार नाही, याबाबत मराठय़ांच्या महाराणीने दिलेले हे अभयपत्र आहे. पत्रात समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींमधील, शिंगणवाडीच्या हनुमंतदेवाचे इनाम, पूर्वी म्हणजे शिवछत्रपतींच्या काळात असे चालत होते, तसेच पुढे चालू ठेवावे, असा आदेश आहे. दिवाकर गोसावी यांनी येसूबाईंना पाठवलेला देवाचा प्रसाद मिळण्याचा उल्लेखही पत्रात आहे.

या दहा ओळींच्या पत्राचे एक मोठे वैशिष्टय़ आपल्यासमोर येते ते म्हणजे, मराठाकालीन महाराणीच्या जीवनातील पत्नीची भूमिका. या पत्रावरील शिक्क्यात ‘सखी राज्ञी जयती’ असे शब्द आले आहेत. सखी हा शब्द मैत्रीण या अर्थाने येतो. आजही सखी शब्द प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. पण अडीचशे वर्षांपूर्वीच्या मराठय़ांच्या महाराणीच्या पत्रावरील ‘सखी राज्ञी जयती’ हे शब्द वाचताना, छत्रपती संभाजीराजे व येसूबाई यांच्या पती-पत्नी या नात्याची महतीच आपल्यासमोर येते.

शिक्कामोर्तबाच्या या पत्रात ‘दाम दौलत हू’ असाही शब्द आहे. याचा अर्थ ‘हे राज्य  चिरायू होवो’ म्हणजे येसूराणींना स्वतंत्र कचेरी, अधिकारी, कारकून नेमलेले होते. त्यांच्या दुसऱ्या पत्राच्या शेवटीही- ‘आमच्याकडे इथे म्हणजे नगरच्या किहडय़ातील कैदेत चांगले कारकून नाहीत,’ असे वाक्य आले आहे.

छत्रपती घराण्याची सून शोभेल अशीच, तेजस्वी व प्रखर वर्तणूक येसूबाईंची होती. शंभूराजांच्या राज्य कारभारात त्यांचे लक्ष्य-हस्तक्षेप असावा हे वरील पत्रावरून आणि बखरीतील उल्लेखावरून वाटते. संभाजीराजांच्या रागाला बालाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा व भाऊ शामजी हे बळी पडले. त्यावेळी येसूबाईंनी हस्तक्षेप करून ‘बाळाजी प्रभूस मारले हे उचित न केले, बहुता दिवसाचे आणि इतबारी व परक्त थोरले महाराजांचे ते कृपाळू. त्यास मारावयाचे कारण नव्हते.’ असे सांगून चिटणीसांची दोन मुले खंडो बल्लाळ व निळो बल्लाळ यांना येसूबाईंनी पुत्रवत सांभाळले.

इ.स. 1705 मध्ये नगरच्या किहडय़ातून, चिंचवडच्या देवांना केलेल्या पैशाच्या मागणीबद्दलचे, त्यांचे दुसरे पत्र मराठय़ांच्या इतिहासात सुप्रसिद्ध आहे. या पत्रात येसूबाई लिहितात, ‘दानधर्म, धर्मदाय व ताम्रांच्या त्रासामुळे आमच्याजवळील पैसे संपून सावकारांचे पाच-सात हजारांचे कर्ज झाले आहे. तुम्ही या त्रासातून आम्हाला मुक्त करावे.. महाराज स्वामी म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूमुळे आम्हावर हा दुर्धर प्रसंग ओढवला आहे.’ यानंतर या पत्रात एक स्त्र्ााr आपल्या पतीवधानंतर, ज्याने तिच्या पतीला मारले त्याच्याच कैदेतून स्वराष्ट्र स्वाभिमानाने लिहिते की ‘इंगळास ओळांबे लागले आहेत.’ इंगळा म्हणजे मोठा विंचू व ओळंबे म्हणजे क्षुद्र मुंग्या. पराक्रमी मराठा राज्याला मोगलरूपी क्षुद्र मुंग्या लागल्या आहेत, ही खंत या पत्रात महाराणी येसूबाई व्यक्त करताना दिसतात.

छत्रपती संभाजीराजांच्या मोहिमांमध्ये अवघड प्रसंगात येसूबाई त्यांच्याबरोबर असत. शंभूराजांच्या सहवासात असताना राजांना सर्व प्रकारचे सहकार्य येसूबाईंनी केले होते, हे संभाजीराजांचे चरित्र वाचले की समजते. शंभूराजांनी मृत्यूला सामोरे जाताना जे धैर्य दाखवले, तसेच धाडस रायगड सोडताना या महाराणीने दाखवले.

शंभूराजे व येसूबाईंची पती-पत्नीची ही नितांत सुंदर आणि एकमेकांवर दृढ विश्वास असणारे हे दांपत्य आपल्या धैर्याने आणि धाडसाने मराठय़ांच्या इतिहासात अमर झाले आहे. वेरूळच्या लेण्यातील शंभूमहादेवाच्या मांडीवर बसलेली पार्वती पाहून मराठय़ांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या माझ्यासारख्या स्त्र्ााrमनाला शंभूराजांच्या येसूबाई साहेबांचा ‘सखी राज्ञी जयती’ हा शिक्का आठवतो.

(लेखिका इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत.)

Twitter – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या