डॉ. अरुणा ढेरे यांना ‘स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य पुरस्कार’ जाहीर

136

सामना प्रतिनिधी, सोलापूर

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार यंदाच्या वर्षी यवतमाळ येथे झालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती मसापचे जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली

11 हजार रुपये रोख, स्वर्गीय जनार्दन बिटला यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे चांदीचे कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यकारी विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार यांच्या हस्ते आणि म. सा. प. पुण्याचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर अरुणा ढेरे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे या समारंभापूर्वी अरुणा ढेरे आणि स्व. दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचे वाचन प्रकाश पायगुडे आणि मसाप जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्षा सायली जोशी करणार आहेत. यावेळी हलसगीकर यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या ब्लॉगचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार यापूर्वी डॉ. स्वर्णलता भिशीकर, डॉ अनिल अवचट, प्रा मिलिंद जोशी, अभिनेत्री स्पृहा जोशी, कवी संदीप खरे आणि क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना देण्यात आला होता.

या कार्यक्रमात यंदाच्या वर्षीच्या राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण होणार असून स्वर्गीय लक्ष्मीबाई माणिकराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुण्याच्या अक्षरधारा या दिवाळी अंकांला , तर स्वर्गीय श्रीनिवास कृष्णाजी जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिकच्या शब्दमल्हार या दिवाळी अंकाला, तर पिंपरी-चिंचवडच्या अक्षरवेध या दिवाळी अंकाला स्वर्गीय सुमतीबाई दत्तात्रय येळेगावकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच नाशिकच्या सुभाषित या दिवाळी अंकाला स्वर्गीय इंदिरा नारायण कुलकर्णी विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

अरुणा ढेरे यांच्याबद्दलची माहिती
कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. संपादनेही केलेली सुनीता देशपांडे यांच्या निकटच्या सहवासातून अरुणा ढेरे यांची वैचारिक आणि साहित्यिक बैठक अधिक समृद्ध झाली आहे असे म्हणता येऊ शकेल. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. या शिवाय स्फुट लेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला.स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेष कारकीर्द घडविलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केलेले आहे. मराठी साप्ताहिके,मासिके,वृत्तपत्रे यांचे त्यानी संपादन केलेले आहे डॉ .ढेरे या महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती आणि साहित्यविषयक समित्यांमध्ये ढेरे यांनी सदस्या म्हणून सहभाग नोंदविलेला आहे. लोकसाहित्य साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था अशा ठिकाणी समिती सदस्यत्वाचे म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठी भाषा आणि या भाषेतील उत्तम साहित्य समाजापुढे येण्यासाठी ढेरे या कार्यरत असतात

या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या